Mallika Rajput Death : बॉलिवूडमध्ये खळबळ! गायिका आणि अभिनेत्रीने उचललं टोकाचे पाऊल, कंगनासोबत झळकली होती चित्रपटात
Mallika Rajput Death : गायिका आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मल्लिकाने सुल्तानपूर येथील राहत्या घरात आत्महत्या केली आहे.
Mallika Rajput Death : गायिका आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत (Bollywood Singer and Actress Mallika Rajput) हीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मल्लिकाने सुल्तानपूर येथील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मल्लिकाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मल्लिका राजपूतने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आले नाही. मल्लिकाने कंगनासोबत काम केले आहे.
मल्लिकाची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की, विजयालक्ष्मी सिंह उर्फ मलिका राजपूत ही नेहमीप्रमाणे रात्री खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला.सकाळी दरवाजा न उघडल्याने दरवाजा कसा तरी उघडला. त्यावेळी मल्लिका ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली.
मल्लिकाने कंगनासोबतही केले होते काम
मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसोबतही काम केले होते. कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तिने 'रिव्हॉल्वर रानी' या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसली होती. गायक शानच्या 'यारा तुझे' या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला नाव आणि प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मल्लिकाने अनेक मालिका, अल्बम आणि मालिकांमध्ये ही काम केले होते.
मल्लिकाने राजकारणातही आजमवले होते नशीब
मल्लिका राजपूतने राजकारणातही आपलं नशीब आजमावले होते. तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2018 मध्ये एका बलात्कारी व्यक्तीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत तिने पक्षाला रामराम केला. मनोरंजन विश्वात आणि नंतर राजकारणात तिची कारकीर्द झेप घेऊ शकली नाही. त्यानंतरमल्लिका अध्यात्माकडे वळली. त्यांनी कपाली महारद यांच्याकडून गृहस्थान संन्यासाची दीक्षा घेतली.
मल्लिकाचा कुटुंबीयांशी वाद
काही वृत्तानुसार, मल्लिकाचा कुटुंबातील सदस्यांसोबत वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावे लागले होते. त्यावेळी पोलिसांनी यात हस्तक्षेप करत वाद मिटवला. त्यानंतर मल्लिकाने आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सध्या स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.