Tamil Director Accident Death : 9 दिवसांपासून बेपत्ता होता, आता नदीत मृतदेह सापडला; तामिळ दिग्दर्शकाचे अपघाती निधन
Tamil Director Accident Death : कार अपघातानंतर मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेले तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह आढळून आला.
Tamil Director Accident Death : मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळ दिग्दर्शकाचा (Tamil Movie Director) अखेर मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेत्री दुराईसामी ( वय 45) (Vetri Duraisamy) यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी (Himachal Pradesh Police) दिली. वेत्री दुराईसामी हे चेन्नईचे माजी महापौर सईदाई दुराईसामी यांचे चिरंजीव आहेत. वेत्री दुराईसामी हे ज्या कारमधून प्रवास करत होते, त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. अपघातात वेत्री यांचे निधन झाले असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली.
इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, उत्तराखंड राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड आणि माहुन नाग असोसिएशनच्या डायव्हर्स यांनी संयुक्त शोध मोहिम केली. त्यात वेत्री यांचा मृतदेह आढळून आला.वेत्री हे चित्रपट दिग्दर्शक होते. 2021 मध्ये विधार्थ आणि रम्या नंबीसन यांचा समावेश असलेला त्यांचा 'एन्द्रावथु ओरू नाल' चित्रपट प्रदर्शित झाला.
कसा झाला मृत्यू?
वेत्री ज्या टोयोटा क्रिस्टामध्ये प्रवास करत होते, ती कार चालकांचे नियंत्रण गमावल्याने कशांग नाल्याजवळ सतलज नदीत कोसळली. 5 फेब्रुवारी रोजी लाहौल आणि स्पितीचा रहिवासी तनजीन नावाच्या ड्रायव्हरचा मृतदेह सापडला होता. वेत्रीचा मित्र एस गोपीनाथ (वय 32) यांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून डोक्याला दुखापत आणि फ्रॅक्चर झालेल्या गोपीनाथची सुटका केली असल्याचे सांगितले. त्याला तातडीने प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (IGMC) दाखल करण्यात आले.
Shocking and truly a wonderful gentleman I’ve known through my father and my friend Dr. Vetriselvi
— Dr. Anbu Arumugam (@AnbuArumugam5) February 13, 2024
Gone too soon #vetriduraisamy #RIP #saidaidiraisamy #manithaneyam #RIPVetriDuraisamy pic.twitter.com/EB8mzZ6qYl
वेत्री यांचा मृतदेह आढळला
सोमवारी त्याचा मृतदेह अपघातस्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर सापडला असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला सुंदर नगरजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास पाण्यात तरंगत असलेला मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह चेन्नईला नेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.