Barbie : 'बार्बी'ने जगभरात केली 8270 कोटी रुपयांची कमाई; एक बिलियनचा पल्ला गाठणारी ग्रेटा पहिली महिला दिग्दर्शिका
Barbie : जगभरात 'बार्बी' हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे.
Barbie Box Office Collection : 'मैं हूँ बार्बी गर्ल' म्हणत लहानांसह मोठ्यांनाही भूरळ पाडणारी 'बार्बी गर्ल' सध्या चर्चेत आहे. 'बार्बी' (Barbie) हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. एकीकडे 'ओपनहायमर' (Oppenhemier) या हॉलिवूडपटाचा धमाका असूनही हा 'बार्बी' या सिनेमाचीदेखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
'बार्बी' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Barbie Box Office Collection)
'बार्बी' हा सिनेमा 21 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2023 मधला सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'बार्बी' या सिनेमाने रिलीजच्या 17 दिवसांत जगभरात आठ हजार 270 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे एक बिलियनचा पल्ला गाठणारी ग्रेटा गेरविग (Greta Gerwig) पहिला महिला दिग्दर्शिका ठरली आहे.
भारतीयांनाही 'बार्बी'ची भुरळ!
भारतात 'बार्बी' या सिनेमापेक्षा 'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे. पण तरीदेखील भारतीय सिनेरसिकांना 'बार्बी' सिनेमाची भुरळ पडली आहे. 'बार्बी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 27.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात 10.95 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडलाही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने भारतात 42.22 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'बार्बी' या सिनेमाने प्रेक्षकांना काल्पनिक गुलाबी जगाची सफर दाखवली आहे. सिनेमातील सर्वांनीच चांगलं काम केलं आहे. मार्गोट रॉबी (Margot Robbie) आणि रयान गोसलिंग (Rayan Gosling) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'बार्बी' या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे.
दिग्दर्शिका ग्रेटासह मार्गोट रॉबी आणि रयान गोसलिंग यांच्याही करियरमधला 'बार्बी' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. 'बार्बी' या सिनेमाने इतिहास रचला आहे. 2023 मधला सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा असून पहिल्या क्रमांकावर 'द सुपर मारियो ब्रदर्स' हा सिनेमा आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'बार्बी'!
'बार्बी' या सिनेमात मार्गोट रॉबी आणि रयान गोसलिंग मुख्य भूमिकेत आहेत. तर सिमू लियू, विल फेरेल, एम्मा मैकी, अमेरिका फेरेरा, एनकुटी गतवा हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.
'बार्बी' हा सिनेमा बार्बी आणि केनच्या आयुष्यावर आधारित आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील मुली आणि महिला खास गुलाबी रंगाचा पेहराव करुन सिनेमा पाहायला जात आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाआधी 'I'm Barbie Girl' वर 43 पेक्षा अधिक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
संबंधित बातम्या