Upendra Limaye: 'अॅनिमल' मध्ये काही मिनिटांचा सीन, तरीही भाव खाऊन गेला; अशी मिळाली उपेंद्र लिमयेला चित्रपटाची ऑफर
अॅनिमल या चित्रपटात उपेंद्रची भूमिका काही मिनिटांची आहे. पण त्या काही मिनिटांमध्ये उपेंद्र प्रेक्षकांची मनं जिंकतो. या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत उपेंद्रनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Upendra Limaye: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या (Sandeep Reddy Vanga) अॅनिमल (Animal) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ देखील घातला आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. अशातच या चित्रपटात काम केलेल्या उपेंद्र लिमये (Upendra Limaye) या मराठमोळ्या अभिनेत्याची देखील चर्चा होत आहे. चित्रपटामधील उपेंद्र लिमयेच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट होत आहे, तसेच उपेंद्रच्या एन्ट्रीवर प्रेक्षक शिट्ट्या देखील वाजवत आहेत. अॅनिमल या चित्रपटात उपेंद्रची भूमिका काही मिनिटांची आहे. पण त्या काही मिनिटांमध्ये उपेंद्र प्रेक्षकांची मनं जिंकतो. अॅनिमल या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत उपेंद्रनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
संदीप रेड्डी वांगाच्या असिस्टंटनं उपेंद्रला केला फोन
मज्जा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपेंद्रनं सांगितलं, "मला एकदा जितेंद्र भोसले या संदीप रेड्डी वांगाच्या असिस्टंटचा फोन आला होता. तो मला म्हणाला की, टी-सीरिजची एक हिंदी फिल्म आहे. त्यामध्ये एक सीन आहे तर तुम्ही तो कराल का? तेव्हा मी त्याला म्हणालो की, एक सीन आहे, त्यामुळे मला काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे मी करणार नाही. त्यानंतर तो मला म्हणाला होता, सर ही संदीप रेड्डी यांची फिल्म आहे, जे अर्जुन रेड्डी या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत. अर्जुन रेड्डी हा चित्रपट मी बघितला होता. तो मला आवडला होता."
पुढे त्यानं सांगितलं, "तेव्हा मला जितेंद्र भोसले म्हणाला की, तुम्ही संदीप रेड्डींसोबत एकदा भेटता का? तेव्हा मी हो म्हणालो. मी संदीप रेड्डीला भेटायला असा विचार करुन गेलो होतो की, आपल्याला हा फिल्ममेकर आवडला आहे. त्याच्यासोबत गप्पा मारु आणि त्याला सांगू की, मी ही फिल्म करत नाही."
"आमची मिटिंग सुरु झाली. तेव्हा मिटिंगमध्ये त्यानं मला सांगितलं की, या चित्रपटाच्या एका सीनमध्ये ड्रामा आहे, हाय व्हॉल्टेज अॅक्शन सिक्वेन्स जो मी प्लॅन केला आहे. त्यामध्ये तू आहेस. त्यानं ज्या पद्धतीनं तो सीन सांगितला, त्यानंतर मी कन्व्हिन्स झालो. ", असंही उपेंद्रनं मुलाखतीमध्ये सांगितलं.
'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या: