Aftab Shivdasani : लिंकवर क्लिक कर, अन्यथा बँक अकाऊंट बंद होईल, आफताब शिवदासानीला फोन, खात्यातून लाखो रुपये उडाले!
Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीला ऑनलाइन फसवणुकीमुळे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताफ शिवदासानी (Aftab Shivdasani) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ऑनलाइन फसवणुकीमुळे अभिनेत्याचे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आफताब शिवदासानी यांची 1.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता आफताफ शिवदासानीला आधी एका मोबाईल क्रमांकावरुन एक संदेश आला होता. या संदेशात,"प्रिय AXIS खाते वापरकर्ता, तुमचे खाते आज निलंबित केले जाईल, कृपया ताबडतोब पॅन-कार्ड अपडेट करा. खालील लिंकवर क्लिक करा -http://biolinkin.co/ELisP".
आफताबने लिंकवर क्लिक केले आणि अॅक्सिस बँकेचे पेज अॅक्सेस केले. त्याचवेळी, त्याला दुसऱ्या अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलरने अॅक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा केला आणि त्याने लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या अॅक्सिस पेजवर आफताबला त्याचा मोबाइल नंबर आणि एम पिन नंबर टाकण्याची विनंती केली. आफताबने या सूचनांचे पालन केले आणि लगेचच त्याला रु 1,49,999 त्याच्या बँक खात्यातून डेबिट झाल्याचे संदेश आला.
वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच आफताबने सोमवारी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मॅनेजरने त्याला डेबिट झालेल्या पैशांबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आफताबने वांद्रे पोलिस स्टेशन गाठले आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
9 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात आयपीसी कायद्याच्या कलम 419 आणि 420, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आफताब शिवदासानी कोण आहे? (Who is Adtab Shivdasani)
आफताब शिवदासानी हा लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता आहे. बॉलिवूडसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतही आफताबने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 1987 मध्ये 'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. बालकलाकार म्हणून काम करायला त्याने सुरुवात केली. अव्वल नंबर, शहंशाह, चालबाज आणि इंसानियत अशा अनेक सिनेमांत तो झळकला आहे.
'मस्त' या सिनेमाने त्याला सुपरस्टार बनवलं. अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' या सुपरहिट सिनेमातही आफताब महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. आफताबचे सिनेमे सुपरहिट होत नसले तरी तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची एकूण संपत्ती 51 कोटी रुपये आहे. निर्मिती संस्थेच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो.
संबंधित बातम्या