कॉस्मेटिक सर्जरीनंतर ह्रदयविकाराचा झटका, वयाच्या 16 व्या वर्षी डेब्यू करणाऱ्या अभिनेत्रीचा 32 व्या वर्षी झाला होता मृत्यू
Bollywood : कॉस्मेटिक सर्जरीनंतर ह्रदयविकाराचा झटका, वयाच्या 16 व्या वर्षी डेब्यू करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचा 32 व्या वर्षी झाला होता मृत्यू

Bollywood : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसलाय. शेफालीचा वयाच्या 42 वर्षी पूर्णपणे फिट असताना मृत्यू झालाय. कारण पूर्णपणे तंदरुस्त असताना देखील तिला कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) आला. तिच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे तिने घेतलेली अँटी-एजिंग औषधं.
आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जीचा वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला. या अभिनेत्रीचा मृत्यू लिपोसक्शन सर्जरीनंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं सांगितलं जातं.
फक्त शेफाली जरीवाला नाही, तर फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सुंदर दिसण्यासाठी फिलर, बोटॉक्स आणि इतर प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात. अशीच एक अभिनेत्री होती जीचा मृत्यू कॉस्मेटिक ट्रीटमेंटदरम्यान हार्ट अटॅकमुळे झाला. विशेष म्हणजे या अभिनेत्रीची ओळख बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी करून दिली होती.
32 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या या अभिनेत्रीचं नाव होतं आरती अग्रवाल. आरतीने बॉलिवूडपेक्षा तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतःचं मोठं नाव कमावलं होतं. केवळ 16 वर्षांची असताना 2001 मध्ये आलेल्या ‘पागलपन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
आरती अग्रवालने आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्यामुळे लवकरच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. मात्र तिचा मृत्यू अचानक आणि दुःखद होता, ज्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडलं.
गुजरातशी संबंधित असलेल्या आरती अग्रवालला सुनील शेट्टी यांनी इंडस्ट्रीत आणलं होतं. त्याच 2001 मध्ये तिने तेलुगू चित्रपट ‘नुव्वु नाकू नचाव’ मधून पदार्पण केलं. या चित्रपटात ती वेंकटेशसोबत झळकली होती आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
त्यानंतर आरतीची लोकप्रियता वाढत गेली आणि तिला एकापेक्षा एक चित्रपटांची ऑफर्स येऊ लागल्या. ती लवकरच टॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली. तिने चिरंजीवी, नागार्जुन, वेंकटेश, बालकृष्ण, महेश बाबू, प्रभास, रवी तेजा आणि तरुण यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
आरतीने तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यात ‘विनर’ आणि ‘बम्बारा कन्नाले’ यांचा समावेश आहे. जरी तिचं करिअर यशस्वी होतं, तरी वैयक्तिक आयुष्य मात्र खूप अस्थिर होतं. 2005 मध्ये तिचं नाव एका टॉलीवूड अभिनेत्याशी जोडलं गेलं आणि ब्रेकअपनंतर ती इतकी तुटली की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, त्या जखमा जीवघेण्या नव्हत्या.
2007 साली आरती अग्रवालने अमेरिकेत राहणाऱ्या आयटी प्रोफेशनल उज्ज्वल निकम याच्याशी विवाह केला. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही आणि अवघ्या दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळणं बंद झालं आणि ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.
आरतीने परत येण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला काम मिळालं नाही. पुन्हा एकदा ऑन-स्क्रीन इमेज मिळवण्यासाठी तिने लिपोसक्शन सर्जरी (पोटावरील चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया) करण्याचा निर्णय घेतला.
4 जून 2015 रोजी अमेरिकेत तिची लिपोसक्शन सर्जरी झाली. त्यानंतर तिला श्वास घेण्यात अडचण आणि इतर आरोग्यविषयक त्रास होऊ लागले. अखेरीस तिला हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या 32 व्या वर्षी तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूमुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















