रणबीरसोबत लग्न; आलिया म्हणते....
चित्रपटाचं स्क्रीनिंग, एखाद्या सेलिब्रिटीची पार्टी किंवा मग कौटुंबीक कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी ही जोडी एकत्र हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं आता रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार असाच प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचं रिलेशनशिप आता सर्वज्ञात झालं आहे. रणबीर आणि आलिया मागील जवळपास दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. चित्रपटाचं स्क्रीनिंग, एखाद्या सेलिब्रिटीची पार्टी किंवा मग कौटुंबीक कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी ही जोडी एकत्र हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं आता रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार असाच प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
मागील वर्षी तर, यांच्या लग्नाच्या चर्चांनी इतरा जोर धरला होता की, लॉकडाऊनच्या दिवसांनंतर आलिया- रणबीरचा विवाह पार पडेल असंही म्हटलं गेलं. पण, असं काही झालं नाही. त्यातच आता आलियानं रणबीरच्या आणि तिच्या नात्याच्याच धर्तीवर विचारल्या जाणाऱ्या लग्नाबाबत रंजक उत्तर दिलं आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी आलियाला लग्नाबाबत विचारताच हल्ली मला सगळे असेच प्रश्न विचारत आहेत ही बाब स्पष्ट करत आपण फक्त 25 वर्ष वयाचेच असल्याचं सांगितलं. इतक्या कमी वयात मी कशी लग्न करु शकेन, बरं तुम्हाला विचारायचंच आहे तर माझ्या कामाबाबत प्रश्न करा. लग्नाचं काय, ते होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच; असं आलिया म्हणाली.
आपण सध्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून, इतक्यात विवाहबंधनात अडकणार नसल्याचं आलियानं स्पष्ट केलं आहे. सध्या बी- टाऊनची ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यासमवेत करिअरवरही पूर्ण लक्ष देत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर बऱ्याच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. तेव्हापासूनच चित्रपटाच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं होतं.
चर्चा त्यांच्याच प्रेमाची
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांचं नातं म्हणजे चाहत्यांसाठी आणि बॉलिवूडकरांसाठीही चर्चेचा विषय. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबातील या दोघांनीही आपल्या क्षेत्रात नाव कमवलं आहे. मुख्य म्हणजे ते एकमेकांना कायमच प्रोत्साहित करत असतात. पुरस्कार सोहळ्यांत जोडीदाराला दाद देणं असो किंवा मग संकटाच्या वेळी साथीदाराच्या कुटुंबाचा आधार होणं असो, आलिया आणि रणबीरनं कायमंच एकमेकांची साथ दिली आहे.