अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम!
मराठीतला अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याने ट्विटरला रामराम ठोकला आहे. त्याने आज शेवटचं ट्वीट करत याची माहिती दिली.
अलिकडच्या काळात माणसाच्या चार गरजा बनल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा तर आहेतच. पण याच्या जोडीला आता इंटरनेटही आलं आहे. कारण, याच इंटरनेटकरवी प्रत्येकजण सोशल मीडियावर कार्यरत असतो. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या जगण्याचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. अलिकडे गेल्या काही महिन्यांपासून कलाकार काय करतो? काय स्वीकारतो? त्याचं मत काय? अशा सगळ्या गोष्टी लोकांना कळतात त्या सोशल मीडियाद्वारे. पण मराठीतला अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे मात्र याच सोशल मीडियाला कंटाळला आहे.
आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद🙏🙏🙏
— Subodh Bhave (@subodhbhave) September 23, 2020
बुधवारी दुपारी ट्विटरवर एक पोस्ट टाकून सुबोधने आपल्या भावनांना वाट करून दिली. या पोस्टमध्ये कुणाचाही राग नव्हता ना निषेध. केवळ या पोस्टमध्ये आपण ट्विटरला रामराम ठोकत असल्याचं त्यानं अत्यंत नम्रपणे सांगितलं. आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले त्याबद्दल धन्यवाद. मी माझं ट्विटर अकाऊंट डीलीट करतो आहे. काळजी घ्या अशाा आशयाची पोस्ट सुबोधने दुपारी टाकली आणि त्याच्या चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
बॉलिवूड अभिनेत्रीकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
सुबोधच्या फॉलोअर्सची ट्विटरवरची संख्या आहे 94 हजारांच्या आसपास. त्याने काहीही पोस्ट केलं की त्याला भरभक्कम रिट्विट मिळत असतात. असं असताना सुबोधने आपलं अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना सुबोध म्हणाला, मी ट्विटरवरून बाहेर पडण्याचं विशेष असं काहीच कारण नाही. पण मला त्याचा कंटाळा आला आहे. तो वेळ मी इतरत्र कुठेतरी घालवू शकेन असं मला वाटतं. त्यामुळे मी ट्विटर सोडतोय. फेसबुक आणि इन्स्टाबाबत मला इतक्यात काही सांगता येणार नाही. कदाचित फेसबुकबद्दलही मी निर्णय घेऊ शकतो. पण आत्ता मी ट्विटरवरून बाहेर पडतोय.
सुबोध भावे सातत्याने अनेक महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतो. आपल्या सिनेमाबद्दल, मालिकेबद्दल याशिवाय तो काही उपक्रम करत असेल तर किंवा लहान मुलांसाठी तो स्टोरीज वाचतो त्याच्या लिंक्स अशा अनेक गोष्टी तो शेअर करताना दिसतो. अत्यंत संवेदनशील अभिनेता आणि माणूस अशी सुबोधची ख्याती आहे. असा माणूस ट्विटर सोडून जातो याबद्दल त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या अनेक फॉलोअर्सनी असं न करण्याचा सल्लाही दिला आहे. तर काहींनी सुबोधसारखे कलाकार सातत्याने ट्रोल होत असतात याला कंटाळूनच त्याने हा निर्णय घेतला आहे यावर भाष्य केलं आहे.
#AnuragKashyap वरील आरोप बिनबुडाचे, कायदेशीर कारवाई करणार, अनुराग कश्यपच्या वकिलांचं वक्तव्य