एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्याच्या राजकारणात युवा जोश, तरुणतुर्क नेत्यांच्या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
अनुभवी नेत्यांसह आता राज्याच्या राजकारणात युवा नेत्यांची संख्या देखील कमालीची वाढली आहे. त्यामुळे युवाजोश वाढल्याचे चित्र सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष देखील पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठांची मक्तेदारी मोडीत काढत तरुणतुर्क नेत्यांनी विधानसभेच्या रणांगणात आपला शड्डू ठोकला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीपासूनच अनुभवी नेत्यांचा भरणा आहे. या नेत्यांनी राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. अनुभवी नेत्यांसह आता राज्याच्या राजकारणात युवा नेत्यांची संख्या देखील कमालीची वाढली आहे. त्यामुळे युवाजोश वाढल्याचे चित्र सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष देखील पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठांची मक्तेदारी मोडीत काढत तरुणतुर्क नेत्यांनी विधानसभेच्या रणांगणात आपला शड्डू ठोकला आहे.
आता विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी युवा उमेदवार मैदानात आहेत. यात सर्वाधिक चर्चा आहे शिवसेनेचे युवराज अर्थात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची. कारण ठाकरे परिवारातून पहिल्यांदाच कुणीतरी निवडणुकीच्या रणांगणात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील वरळीमधून निवडणूक लढवत आहेत. आदित्य निवडणूक लढवत असल्याने या ठिकाणी मनसेने उमेदवार दिलेला नाही. मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचे आव्हान आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी देखील आदित्य यांच्या विरोधात उमेदवारी दिल्याने चर्चा होत आहे.
दुसरीकडे पवारांच्या तिसऱ्या पिढीतून रोहित पवार यांच्याकडे देखील राज्याचे लक्ष लागून आहे. कर्जत जामखेडमधून मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित यांनी शड्डू ठोकला आहे. जिल्हा परिषद सदस्य असलेले रोहित मागील अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखताना दिसत होते.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी रणांगणात आहेत. आमदार अमित देशमुख यांच्यासह त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून काँग्रेसकडून मैदानात आहेत. तर कणकवलीमधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे काँग्रेसला राम राम ठोकत भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. राज्यभरात शिवसेना भाजपा युती असताना राणे यांच्यासमोर मात्र शिवसेनेचे कडवे आव्हान आहे.
खान्देशात मुक्ताईनगरमधून यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे देखील पुन्हा विधानसभेत जाण्याच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र त्यांच्यासमोर देखील काँग्रेसच्या अंतर्गत विरोधासह शिवसेनेचे दिलीप माने यांच्यासह आडम मास्तरांचे आव्हान देखील आहे.
सांगोल्यात शेकापचा बालेकिल्ला आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी आजोबाच्या जागी नातवाला पुढे आणले आहे. 55 वर्षे सांगोल्याचे आमदार म्हणून विक्रम करणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी यंदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यावर शेकाप कार्यकर्त्यांना आजोबाच्या जागी एकमुखाने नातवाला पुढे केले आहे. डॉ. अनिकेत हे सध्या मेडीकलचे शिक्षण घेत आहेत. सांगोल्यातून शेकापकडून पहिल्यांदा भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी घोषित केली होती, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर डॉ. अनिकेत यांना उमेदवारी दिली गेली आहे. यामुळे रुपनर यांच्या बंडाचा सामना देखील त्यांना करावा लागणार आहे.
माळशिरसमधून ऊसतोड मजुराच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली आहे. मोहिते-पाटील यांच्यामुळे हाय प्रोफाइल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या माळशिरस राखीव मतदारसंघातून यंदा भाजपने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राम सातपुते मैदानात आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे शहाजी पाटील यांचे आव्हान आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले राम सातपुते बीड जिल्ह्यातील आष्टी गावाचे असून, त्यांचे वडील मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षी साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी यायचे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील मैदानात आहेत. ऋतुराज हे अवघे 29 वर्षाचे आहेत. ऋतुराज पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. ऋतुराज यांनी आज सायकल रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. भाजपचे आमदार अमल महाडिक यांना ऋतुराज पाटील यांनी आव्हान दिले आहे.
राज्याच्या राजकारणात शरद पवार यांनी वयाच्या 27 व्या वर्षी आमदार होत विधानसभेत प्रवेश केला होता. तर पवार हे 37 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी यंदा बरेच युवा उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. या तरुण चेहऱ्यांना किती यश मिळेल, हे आता 24 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
या उमेदवारांच्या लढतींकडेही राज्याचे लक्ष
भोकरदन - संतोष दानवे पाटील (भाजप)
नगर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
बीड- संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिराळे (भाजप)
कळवा मुंब्रा - दीपाली सय्यद (शिवसेना)
रायगड - आदिती तटकरे (राष्ट्रवादी)
साकोली - परिणय फुके (भाजप)
वडगाव शेरी - जगदीश मुळीक (भाजप)
हडपसर - योगेश टिळेकर (भाजप)
विक्रोळी - सिद्धार्थ मोकळे, (वंचित)
औरंगाबाद - अमित भुईगळ, (वंचित)
बेलापूर - गजानन काळे (मनसे)
सोलापूर मध्य फारुख शाब्दी (MIM)
औसा - सुधीर पोतदार (वंचित)
करमाळा - रश्मी बागल (शिवसेना)
पुणे कॉन्टमेन्ट- सुनील कांबळे (भाजप)
केज - नमिता मुंदडा (भाजप)
नांदगाव - विशाल वडगुले (आप)
पर्वती - संदीप सोनवणे, (आप)
नंदुरबार - डॉ. सुनील गावित, (आप)
नागपूर- डॉ. अजय हडके (आप)
सोलापूर शहर उत्तर- आतिश बनसोडे (MIM)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
मुंबई
नाशिक
Advertisement