विदर्भात EVM ला 'या' परभूत उमेदवारांनी केलं चॅलेंज! निवडणुक आयोग केवळ तपासणार मेमरी चीप , मोजणी होणार की नाही?
Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी जे अर्ज केले त्यानुसार त्यांना ईव्हीएम मशीन व मेमरी चिप तपासून दिली जाईल. EVPATची मोजणी होणार नाही.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये 288 जागांपैकी 236 जागा मिळाल्यानं महायुतीचं पारडं जड झालं. 150 जागांच्या घरात विजयाचा आकडा जाईल अशी अपेक्षा असताना 50 चा आकडाही ओलांडता न आल्यानं महाविकास आघाडीला विधानसभेच्या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. दरम्यान विदर्भात 62 जागांपैकी केवळ 13 जागांवर महाविकास आघाडीला झेंडा रोवता आला. राज्यात विरोधकांकडून एकीकडून EVM वर शंका घेतली जात असताना पराभूत उमेदवार EVM आणि मतमोजणीवरून निवडणूक आयोगाला चॅलेंज करत आहेत. दरम्यान,विदर्भातील पराभूत उमेदवारांपैकी आतापर्यंत 3 उमेदवारांचे आयोगाकडे अर्ज करण्यात आले आहेत.मात्र या प्रक्रियेत ईवीपॅडची मत मोजणी होणार का या बद्दल शंका आहे.निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी जे अर्ज केले त्यानुसार त्यांना ईव्हीएम मशीन व मेमरी चिप तपासून दिली जाईल. EVPATची मोजणी होणार नाही.
विदर्भात EVM ला 'या' उमेदवारांनी केलं चॅलेंज?
विदर्भात काँग्रेस पक्षाचे नागपूर दक्षिणचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती विधानसभेचे सुनील देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुमसर विधानसभेचे चरण वाघमारे यांनी EVM तपासणीसाठी अर्ज केले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 ते 11:30 दरम्यान वाढलेल्या मतदानाला आक्षेप घेत या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. गिरीश पांडव यांनी VVPAT मध्ये नोंदविलेला डेटा, मेमरी व्हेरिफिकेशन जुळविण्यासाठी 3 लाख रुपये भरल्याचं सांगण्यात येतंय. मात्र VVPATची मोजणी होणार का? याबद्दल शंका आहे.
मराठवाड्यात 9 जणांचे पुर्नमतमाेजणीसाठी अर्ज
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत. आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान, महायुतीच्या लॅन्डस्लाईड विजयामुळे EVM वर शंका घेत मविआतील नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करायला सुरवात केली आहे. मराठवाड्यातून आतापर्यंत फेरमतमोजणीसाठी ९ जणांनी अर्ज केले आहेत.यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून ४, जालना, परभणीमधून प्रत्येकी एक तर धाराशिवमधून ३ उमेदवारांनी पुन:मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत.
EVM च्या हॅकींगवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे ईव्हीएमबाबत अनेक दावे करत आहेत. त्यातच सोशल मीडियावर EVM हॅक होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर नुकतेच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याबाबत एक्सवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले आहे. “व्हिडीओमधील व्यक्ती ईव्हीएम हॅकिंगबाबत निराधार, खोटा आणि बिनबुडाचा दावा करत असल्याचं सांगत EVM हॅक करता येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. व्हिडीओमधील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंही सांगण्यात आलं आहे.