Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दोन लोकसभा मतदारसंघाची मागणी, शिर्डीतून लढवण्यास इच्छुक
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत देखील चर्चा केल्याचे सांगत सोलापूर लोकसभेची राखीव जागा दिली तरी रिपाई लढविण्यास तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले .
सोलापूर : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन जागांची मागणी केलीय. एवढंच नाही तर आपण शिर्डीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या वेळी शिर्डीतून आपण पराभूत झाल्याने शिर्डीचा विकास झाला नाही, असाही टोला त्यांनी लगावलाय. पंढरपूरमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी आठवलेंनी ही इच्छा व्यक्त केली.
शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक
रामदास आठवले हे पंढरपूर आणि सांगोला दौऱ्यावर असताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी ते बोलत होते . मनसे चे नेते दिलीप धोत्रे यांनी निमंत्रण दिल्याने आपण आल्याचे सांगताना राज्यात मनसे महायुतीत येणार का याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकतील असे त्यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितल्या असून आपण स्वतः शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले .
जे पी नड्डा यांच्यासोबत देखील चर्चा
गेल्या वेळी शिर्डीतून पराभूत झाल्याने शिर्डीचा कोणताही विकास झाला नाही असे सांगताना सध्या आपण मंत्री असून शिर्डीच्या विकासासाठी पर्यटन करू असे सांगितले . शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असल्याने भाजप , शिंदेसेना या सर्वांशी चर्चा करून आपणास संधी मिळाल्यास ही निवडणूक शिर्डीतून लढविण्यास तयार असल्याचे आठवले यांनी सांगितले . यासाठी आपण भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत देखील चर्चा केल्याचे सांगत सोलापूर लोकसभेची राखीव जागा दिली तरी रिपाई लढविण्यास तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले .
रामदास आठवले यांनी 2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे रामदास आठवलेंना पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पराभवानंतर रामदास आठवले 2014 साली भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आणि थेट केंद्रात राज्यमंत्री झाले.2019 च्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता आठवलेंच्या वक्तव्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा :