Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
Shivsena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईच्या मागाठाण्यात अखेरच्या क्षणी फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळं राज सुर्वे यानं निवडणुकीतून माघार घेतली.

मुंबई : मुंबई महापालिकेत महायुतीत 90 जागा लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याला महापालिका निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. राज सुर्वे याची उमेदवारी वॉर्ड क्रमांक 4 मधून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शिवसैनिकांच्या रोषानंतर शिवसेनेनं मागाठाणे येथे उमेदवार बदलले. शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीत वॉर्ड क्रमांक 3 वरुन मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. यानंतर हा वॉर्ड भाजपचे विधानपरिषद प्रविण दरेकर यांच्या भावासाठी सोडण्यात आला. प्रकाश दरेकर यांनी तिथून उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यानं मोठं नाराजीनाट्य सुरु झाल्याचं पाहायला मिळाल.
राज सुर्वे याची माघार
शिवसेनेने सुरुवातीला प्रभाग क्रमांक चार मधून संजना घाडी यांना उमेदवारी निश्चित केली होती. तर, वॉर्ड क्रमांक 5 मधून राज सुर्वे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात मागाठाण्यात पुन्हा उमेदवार बदलण्यात आले. संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 मधून लढणार आहेत. तर, मंगेश पांगारे हे प्रभाग क्रमांक 4 मधून लढणार आहेत. तर, राज सुर्वे यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावली.
प्रकाश सुर्वे, राज सुर्वे यांची प्रतिक्रिया
मागाठाणे येथील उमेदवारीतील बदलांमुळं राज सुर्वे यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांनी फेसबुक पोस्ट करत भूमिका जाहीर केली आहे. आमच्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचा शब्द हा अंतिम आहे. कार्यकर्त्यांचा बळी देऊन वैयक्तिक हित साधणे हे आम्हाला कदापि मान्य नाही. प्रामाणिकपणे, निष्ठेने कार्य करणारे माझे सहकारी माझ्यासाठी महत्वाचे आहेत.
त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पक्षहितासाठी जो निर्णय घेतला आहे, त्याचा आम्ही पूर्ण सन्मान करतो आणि मनापासून स्वीकार करतो, असं प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांनी म्हटलं आहे.
मागाठाणेत काय घडलं?
बोरिवली मागाठाणे मतदार संघात आमदार प्रकाश सुर्वे विरोधात मोठी नाराजी निर्माण झाली होती. दहिसर मध्ये मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांचे जागावर फेरबदल केल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये आमदार प्रकाश सुर्वे आणि एकनाथ शिंदे विरोधात मोठी नाराजी होती. त्याची दखल घेत अखेरच्या वेळी उमेदवारांमध्ये बदल करण्यात आले. राज सुर्वे यानं माघार घेतली. तर, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं इच्छुक प्रकाश पुजारी यांच्या समर्थकांकडून प्रकाश सुर्वेंविरोधात निदर्शने करण्यात आली. सुर्वे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.





















