Shivadi Vidhan Sabha Constituency: शिवडीत ठाकरेंची निष्ठा जिंकली; निष्ठावंत अजय चौधरींकडून बाळा नांदगावकरांचा पराभव
Shivadi Vidhan Sabha Constituency: शिवडीचा पारंपरिक गड ठाकरेंनीच राखला. निष्ठावंत अजय चौधरींनी बाळा नांदगावकरांचा पराभव करुन दणदणीत विजय मिळवला.
Shivadi Vidhan Sabha Constituency 2024: मुंबई शहरातील शिवडीचा पारंपरिक गड ठाकरेंना स्वतःकडे राखण्यात यश आलं आहे. उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत अजय चौधरींना शिवडी विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. अजय चौधरींनी ठाकरेंचा विश्वास खरा ठरवत मनसेच्या बाळा नांदगावकरांचा दारुण पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची निष्ठा जिंकल्याचं पाहायला मिळालं. तर, मनसेच्या बाळा नांदगावकरांना महायुतीनं जाहीर पाठिंबा दिला होता. ठाकरेंकडून त्यांचा पारंपरिक मतदारसंघ हिसकावण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. पण, अखेर शिवडीतून ठाकरेंचे निष्ठावंत अजय चौधरींनी बाजी मारली.
यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या (Maharashtra Assembly Election 2024) भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असल्याचं बोललं जात होतं. याला कारण म्हणजे, गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेला अभूतपूर्व सत्तासंघर्ष. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक होती. या निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली आहे. पण, या निवडणुकीत काही पारंपरिक मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात ठाकरेंना यश आलं आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या हायव्होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे, शिवडी विधानसभा मतदारसंघाची (Shivadi Assembly Constituency) लढत. शिवडीतून ठाकरेंनी त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या विद्यमान आमदार अजय चौधरींना (Ajay Chaudhari) निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर, मनसेकडून माजी आमदार बाळा नांदगावकरांना (Bala Nandgaonkar) तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीनं आपला उमेदवार न देता, बाळा नांदगावकरांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवडीचा गड ठाकरे राखणार की, पारंपरिक वर्चस्वाला आव्हान देत बाळा नांदगावकर पुन्हा शिवडीचे आमदार होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. अटीतटीच्या लढतीत अजय चौधरींचा विजय झाला आहे.
ठाकरेंचा कौल एकनिष्ठतेला...
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेला शिवडी मतदारसंघ म्हणजे, शिवसेनेचा पारंपरिक गड. बंडानंतरही शिवडीतील जनता ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभी राहिल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. ठाकरेंच्या पडत्या काळात शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी एकनिष्ठता दाखवली. तसेच, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनीही ठाकरेंना साथ दिली. याचंच बक्षिस ठाकरेंनी चौधरींना दिल्याचं बोललं जात होतं. शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंकडून लालबाग-परळसारख्या भागात लालबागचा राजा मंडळाची सचिव सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र, एकनिष्ठतेचं फळ अजय चौधरींच्या पारड्यात पडलं. मिळालेल्या संधीचं सोनं करुन अजय चौधरींनी दाखवलं.
राज ठाकरेंचा हुकुमी एक्का मैदानात...
राज ठाकरेंनी शिवडीचा गड उद्धव ठाकरेंच्या हातून हिसकावण्यासाठी कंबर कसलेली. राज ठाकरेंनी आपला खंदा कार्यकर्ता आणि विश्वासू, तसेच, यापूर्वी शिवडीचा गड सर करणारा आणि सलग दोन टर्म आमदारकी मिळवलेला आपला हुकुमी एक्का बाळा नांदगावकरांना शिवडीच्या रणांगणात उतरवलं. अशातच महायुती कोणता डाव खेळणार? शिवडीतून कुणाला तिकीट देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र, महायुतीनं एक पाऊल मागे टाकत आपला डाव खेळला आणि आपली संपूर्ण ताकद बाळा नांदगावकरांच्या पाठिशी उभी केली. महायुतीनं आपला उमेदवार न देता, बाळा नांदगावकरांना जाहीर पाठिंबा दिला. मात्र, शिवडीकरांनी महायुतीचा डाव हाणून पाडला.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानसभेवरील उद्धव ठाकरेंच्या पारंपरिक वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी महायुतीनं दुसऱ्या ठाकरेंना साथ दिली आहे. पण, ठाकरेंनी आपला गड स्वतःकडे राखलाच.
मतदारसंघाबाबत थोडंसं...
शिवडी विधानसभेतून 2009 मध्ये बाळा नांदगावकर यांनी दणदणीत विजय मिळवत आमदारकी मिळवली होती. मनसेसाठी हा मोठा विजय होता. कारण, नुकतीच शिवसेनेपासून फारकत घेत राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरची राज ठाकरेंची ही पहिलीच निवडणूक होती. राज ठाकरेंनी शिवसेनेकडून त्यांचा पारंपारिक गड हिरावला खरा, पण दीर्घकाळ ही पकड टिकली नाही.
2014 विधानसभा निवडणूक निकाल
2014 च्या विधानसभा निवडणुकीत, शिवसेनेचे अजय चौधरी यांनी मनसेकडून मतदारसंघ हिसकावला आणि पुन्हा शिवसेनेचा भगवा शिवडीवर फडकला. अजय चौधरी यांच्या विजयानं शिवसेनेची या क्षेत्रातील पकड अधिक मजबूत झाली. 2014 मध्ये शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती आणि त्याचा फायदा शिवडी मतदारसंघावरही दिसून आला. अजय चौधरी यांनी 72,464 मतांनी विजय मिळवला, तर मनसेचे बाळा नांदगांवकर यांना 30,553 मतांवर समाधान मानावं लागलं. अजय चौधरींनी मोठा विजय मिळवत बाळा नांदगावकरांना पराभूत केलं.
2019 विधानसभा निवडणूक निकाल
2019 च्या विधानसभा निवडणुकीत, अजय चौधरी यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर शिवडी विधानसभा क्षेत्रात विजय मिळवला. यावेळी त्यांना 77,687 मतं मिळाली, जी मागील निवडणुकीपेक्षा अधिक होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात मुख्य प्रतिस्पर्धी मनसेचे संतोष रघुनाथ नलवाडे होते, ज्यांना 38,350 मतं मिळाली. अजय चौधरी यांच्या विजयानं जवळपास हे सिद्ध केलं की, शिवडी आता शिवसेनेपासून कोणीच वेगळं करु शकत नाही.