Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ हजेरी ठरली लक्षवेधी
Narendra Patil: कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महेश शिंदे रिंगणात आहेत.
सातारा : सातारा कोरेगाव विधानसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमुळं जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
नरेंद्र पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी
माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य केलं. शशिकांत शिंदे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करत असताना देखील नरेंद्र पाटील उपस्थित होते. शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करत असताना नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ असलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.
उमेदवारी दाखल केल्यावर शशिकांत शिंदे काय म्हणाले?
शशिकांत शिंदे यांनी कोरेगावकरांच्या हितासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं म्हटलं आहे. माझ्या जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या संकल्पासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तुम्हा सर्व जिवाभावाच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या व सामान्य जनतेच्या प्रेमानी मी धन्य झालो! आज माझा अर्ज भरण्यासाठी आपण सर्वांनी दाखवलेलं प्रेम आणि गर्दी इथेच माझा विजय निश्चित आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी माझी जबाबदारी आणि सेवा जनतेच्या आर्शिवादाने अधिक दृढ झाली आहे. त्यांच्या साथीनेच कोरेगाव-खटाव-सातारा सृजनशील आणि निष्ठावान घडवण्याची स्वप्ने पुन्हा सत्यात उतरवण्याचा निर्धार आपण सर्वांनी माझ्यासोबत घेतला आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. कोरेगावात शशिकांत शिंदे, फलटणला दीपक चव्हाण, माणला प्रभाकर घार्गे, कराड उत्तरला बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणला पृथ्वीराज चव्हाण, पाटणला हर्षद कदम, साताऱ्यातून अमित कदम आणि वाई मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मविआमध्ये काँग्रेसला 1 जागा, ठाकरेंच्या शिवसेनाला 2 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत.
इतर बातम्या :