शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भातील सात मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 45 उमेदवारांची यादी जाहीर करत नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. त्यामध्ये, बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार, कवठे-महांकाळमधून रोहित पाटील आणि विदर्भातून विद्यमान मंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते धर्मराव आत्राम यांच्या कन्येला तिकीट देण्यात आलंय. भाग्यश्री आत्राम हा शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमधील विदर्भातील मोठा युवा चेहरा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादाती विदर्भातील सात उमेदवारांची घोषणा केली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षात नुकतेच प्रवेश केलेल्यांना संधी देण्यात आलीय. शरद पवारांच्या विदर्भातील यादीत अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे मोठं नाव असून विदर्भातील यादीचं वैशिष्ट जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भातील सात मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गेल्या काही दिवसात पक्षात येणाऱ्यांना संधी देत नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवण्यात आलंय. शरद पवारांच्या यादातील सर्वात प्रमुख नाव काटोल मतदारसंघातून माजी मंत्री अनिल देशमुख यांचं आहे. त्याशिवाय सिंदखेड राजा मतदारसंघातून अवघ्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातून शरद पवार गटांमध्ये आलेल्या राजेंद्र शिंगणे यांना संधी देण्यात आली आहे.
तुमसर मध्ये गेल्या आठवड्यातच शरद पवार गटात प्रवेश करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांना संधी मिळाली आहे.
अहेरी मतदारसंघामधून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाग्यश्री आत्राम यांनी गेल्या महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
तिरोडामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीच्या वेळेला आधी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आणि दोन महिन्यानंतर शरद पवार यांच्या गटात पुनरागमन करणाऱ्या रविकांत बोपचे यांना संधी मिळाली आहे. रविकांत बोपचे माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र आहेत.
मुर्तीजापुरमधून अपक्ष जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांना पवार गटाने संधी दिली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विदर्भातील यादीत सर्वात धक्कादायक मतदारसंघ म्हणजे नागपूर पूर्व आहे. नागपूर पूर्व या काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात पक्षाने त्यांचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना संधी दिली आहे.