अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
खरंतर पवारसाहेब व राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा निर्णय स्वीकार करतो.
मुंबई : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाची पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडं आव्हान दिलंय. सर्वाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra pawar) म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय. दुसरीकडे विदर्भात मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यातच, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यामुळे, बारामतीमधील (Baramati) लढत रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी होणार आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी एबीपी माझासोबत एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला, खरंतर पवारसाहेब व राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा निर्णय स्वीकार करतो. मला दिलेल्या संधीचं सोनं करीन, पवारसाहेबांना माझा अभिमान वाटेल असं काम मी करेन, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. मुद्दे अनेक आहेत, बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 25 गावांत प्यायला पाणी नाही. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसेच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे, असे म्हणत युगेंद्र पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी बुधवारी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांपासूनच युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी बारामतीत लढत होईल, अशी चर्चा होती. त्यानुसार आता ही लढत निश्चित झाली असून पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यादी
जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार - बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे - कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर