Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
Walmik Karad in beed hospital: वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बीडमध्ये वाल्मिक कराडचे प्रस्थ किती मोठे आहे, याची कल्पना या सगळ्यावरुन येऊ शकते.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याला स्थानिक प्रशासनाकडून व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराड याला दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात (Beed News) दाखल करण्यात आले होते. त्याला शनिवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यानंतर वाल्मिक कराड याला बीड जिल्हा रुग्णालयात देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटच्या सुरस कहाण्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दैनिक 'लोकमत'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार वाल्मिक कराड (Walmik Karad) याला रुग्णालयात कैद्यांसाठीचे प्रोटोकॉल डावलून कशाप्रकारे विशेष वागणूक देण्यात आली, याचा तपशील समोर आला आहे.
वाल्मिक कराड याला उपचारांसाठी ज्या बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिकडे आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे. या कोठडीत चार बेड असून या कोठडीला मजबूत लोखंडी दरवाजा आहे. शनिवारी दुपारी या वॉर्डमध्ये परळीच्या गुन्ह्यातील एकमेव आरोपी उपचार घेत होता. तीन बेड रिकामे होते. मात्र, तरीही वाल्मिक कराडला उपचारासाठी याठिकाणी ठेवण्यात आले नाही. त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले. वाल्मिक कराडला या वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सुरक्षेचे कारण पुढे करत वाल्मिक कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याची चर्चा रंगली आहे.
वाल्मिक कराड याच्यावर ज्या सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते, तो वॉर्ड इतरांच्या तुलनेत चकाचक आहे. त्याठिकाणी स्वच्छता आणि सर्व सोयीसुविधा आहेत. या वॉर्डमध्ये एकूण 24 बेड आहेत. मात्र, वाल्मिक कराड याला ज्या बाजुला ठेवण्यात आले होते, त्या एका बाजूचे 11 बेड रिकामे ठेवण्यात आले होते. याठिकाणी आरसीपीसीसह 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि आणखी काही पोलीस कर्मचारी 24 तास तैनात होते. या वॉर्डमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची कसून तपासणी केली जात होते. या सगळ्यामुळे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज
बीड जिल्हा रुग्णालयात दोन दिवस मुक्काम करुन उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड याला शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याची रवानगी पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात करण्यात आली. वाल्मिक कराड याच्यावर सरपंच देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी अशा दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडची सुटका अवघड मानली जात आहे. परंतु, पोलिसांच्या ताब्यात असतानाही वाल्मिक कराड याला पूर्वीप्रमाणेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा