अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी
बारामती मतदारसंघातल्या कन्हेरी येथे युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर बोलताना अजित पवार भावूक झाले होते.
मुंबई : राज्यातील महत्वपूर्ण लढतींपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, यंदा काका विरुद्ध पुतण्या असा सामना बारामतीत होत आहे. त्यात, शरद पवारांनी पुतण्या अजित दादांविरुद्ध शड्डू ठोकला असून युगेंद्र पवार यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. म्हणूनच, बारामती मतदारसंघात (Baramati) त्यांनी थेट अजित पवारांच्या भावनिक होण्याची नक्कल केली होती. त्यावरून, आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना, पवारसाहेबांनी नक्कल केल्याने आपणास खूप वेदना झाल्याचं म्हटलं होतं.
बारामती मतदारसंघातल्या कन्हेरी येथे युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर बोलताना अजित पवार भावूक झाले होते. तसेच, घर फुटल्याचे सांगत त्यांनी आईचा संदर्भ देखील दिला होता. मात्र, अजित पवारांच्या त्या सभेच्या दुसऱ्या दिवशीच, त्याच कन्हेरीत घेतलेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवार यांच्या भावूक होण्याची नक्कल केली. शरद पवारांची या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी देखील अशीच नक्कल केली होती. त्यामुळे, बारामतीमधील पवार कुटुंबातील वाद आता राजकीयदृष्ट्या टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची कृती त्यांना मानणाऱ्या प्रत्येकासाठी वेदनादायी असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
शरद पवारांशी जोडलेला प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांना बापाच्या भूमिकेत पाहतोय. त्यामुळे बापाने मुलाची मिमिक्री करणे हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दुःखदायक असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांच्या भावना या खऱ्या होत्या, त्यात कोणतंही राजकारण नव्हतं, म्हणून ते व्यक्त झालेत. मात्र, अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं हे फार वेदनादायी असल्याचेही मिटकरी यांनी म्हटलंय.
अजित पवारांनीही दिली होती प्रतिक्रिया
शरद पवार यांच्यासारख्या देशातील मोठ्या नेत्याने माझी नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. मी त्या सभेत आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी रुमाल काढला नव्हता. त्यांनी रुमाल काढला, डोळे फुसले, असं अजित पवार म्हणाले. तसेच मी शरद पवार साहेबांना दैवत मानलं. मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं आणि आता साहेबांनी मुलासारखा असणाऱ्याची नक्कल केल्यावर मला खूप वेदना झाल्या, अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या.