Telangana CM : काँग्रेसकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित, पण उपमुख्यमंत्र्यांचं नाव अजूनही गुलदस्त्यात
Telangana CM : तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये अद्यापही निर्णय झालेला नाही.
मुंबई : तेलंगणामध्ये (Telangana) मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचं नाव काँग्रेसने (Congress) निश्चित केलं आहे. तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी (Revant Reddy) हे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेसकडून तेलंगणामध्ये उपमुख्यंत्री देखील निवडले जातील. परंतु उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये. तेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने 39 तर भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला 60 जागांची आवश्यकता होती. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून आता काँग्रेसच्या हातात तेलंगणाची सत्ता असणार आहे. दरम्यान या निवडणुकांमध्ये काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली.
रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. आता काँग्रेसने देखील त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्यामुळे राज्याची सूत्रं ही रेवंत रेड्डींकडे सोपवण्यात आली आहेत.
विधिमंडळ पक्षाची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी रविवार 3 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर सोमवारी 4 डिसेंबर रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी नियुक्त करण्यात आल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, हे अधिकृतता पत्र खर्गे यांना पाठवले जाणार असून पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे. त्यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला आणि मल्लू भट्टी विक्रमार्का आणि डी. श्रीधर बाबू यांच्यासह ज्येष्ठ आमदारांनी त्याला पाठिंबा दिला.
बीआरएसची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात
भारत राष्ट्र समिती (BRS) 10 वर्षे तेलंगणात सत्तेवर होती. पराभवानंतर बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हे मान्य करत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला तगडं आव्हान दिलं. पण यामध्ये काँग्रेस वरचढ ठरली आणि काँग्रेसचा तेलंगणामधील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.