गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत, म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, असे राज म्हणाले.

Raj Thackeray:मुंबईत मराठी टक्का फक्त 27 टक्के उरला आहे, असे जे आकडे सांगितले जातात, ते मराठी माणसालाखच्चीकरण करण्यासाठी सांगितले जातात. मुंबईत मराठी टक्का 40 ते 41 टक्के असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज यांनी माझा कट्टावर बोलताना मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी सांगून मराठी माणसाचे खच्चीकरण केलं जातं असल्याचे सांगितले. राज यांनी नमूद केलं की, साधारणपणे मुंबई मधला गुजराती मारवाडी टक्का 13 टक्के आहे आणि युपी बिहार हा सगळा जर पट्टा पकडला तर तो साधारणपणे 15 टक्के आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, मराठी माणसाला निश्चित समजलेलं आहे की कोणाच्या बाजूने उभं राहायचं. तुम्ही जागे रहा आणि काय प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय त्याच्या विरोधात तुम्ही जोरदार मतदानाला उतरा, समोरच्यांनी आखलेले जे काही मनसुबे आहेत ते उध्वस्त करा, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी मतदारांचा टक्का हा ४० ते ४१ टक्के असल्याचे सांगून कमी आकडेवारी सांगणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का?
राज यांनी सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे वेळ फार कमी मिळाला या निवडणुकीला. अचानक मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा ठरला आणि लगेच 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या. हा कॉन्फिडन्स येतो कुठून की 15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत, म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, असे राज म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचा फायदा आणि विरोधकांची कोंडी
राज यांनी सांगितले की, विरोधी पक्षाला वेळच द्यायचा नाही. तुम्हाला तारखा माहिती असतात त्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. त्यामुळे या योग्य निवडणुका होतात हे मला दिसत नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, 31 डिसेंबरच्या काळात लोक बाहेर असतात आणि अशा काळात अचानक निवडणुका लावणे हे अनाकलनीय आहे. निवडणूक आयोगाची मतदारांची यादी जी आहे फायनल यादी ती काल आली असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत जागा कोणत्या आरक्षित होत आहेत आणि तिथे कोणता उमेदवार टाकायचा ही प्रक्रिया सोपी नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मी बाकीच्या महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो की त्या सगळ्या ठिकाणी आम्ही मी तरी आम्ही तरी पोहचू शकलो नाही.
चार प्रभाग पद्धत आणि गोंधळ
राज ठाकरे म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीतील प्रभागांची रचना अत्यंत गोंधळात टाकणारी आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणी आमचं व्यवस्थित झालं, पण आरक्षण आणि हे चार प्रभाग या गोष्टींबद्दल मी इतका गोंधळात आहे की, सत्तेत असलेले लोक विरोधकांना कायम 'बेसावध' ठेवण्यासाठी अशा गोष्टी आगाऊ करून ठेवतात. विशेषतः चारच्या प्रभागांवर टीका करताना ते म्हणाले की, हे फॅड काँग्रेसच्या काळात आलं. मतदारांनी तिथे जाऊन चार-चार बटनं का दाबायची? भारतामध्ये अशा प्रकारची सिस्टीम कुठेही नाही, ती फक्त महाराष्ट्रात राबवली जाते. ते म्हणाले की, चारचे प्रभाग केल्यामुळे वेगवेगळी माणसं निवडून येतात आणि मग कोणीच काम करू शकत नाही. एखादा काम करायला गेला की दुसरा अडकाठी करतो. या मुद्द्यावर कायदेशीर लढा देण्याचा प्रयत्न केला असता, यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवतात. आम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात गेलो, तर ते म्हणतात हे निवडणूक आयोगाकडे येतं आणि निवडणूक आयोग म्हणतं हा राज्य सरकारचा निर्णय आहे. ही नुसती चालढकल आहे.
अडीच-अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरली
राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या एका विधानाचा दाखला देत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना सांगितलं गेलं की भाजपमध्ये या, अडीच-अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. हे विधान पिंपरी-चिंचवड संदर्भात असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर असं म्हणत असतील की मशीनमध्ये मतं भरलेली आहेत, तर ही फेअर इलेक्शन नाही.
इतर महत्वाच्या बातम्या




















