Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
Raj Thackeray on BMC Election 2026: प्रचार फक्त बाहेरुन दिसतो, आतून बऱ्याच गोष्टी सुरु असतात. आत बरीच कामं सुरु असतात. मुंबईत हवी ती वातावरणनिर्मिती झाली आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray on BMC Election 2026: राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कमी वेळात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लावल्या. त्यामुळे विरोधी पक्षांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तारखा माहिती असतात, त्यामुळे त्यांची तयारी झालेली असते. पण विरोधी पक्षांना तारखा माहिती नसल्याने फक्त आठ दिवसांत 29 महानगरपालिकांमध्ये (Mahangarpalika Election 2026) प्रचार करणे शक्य नाही. अशाप्रकारे निवडणुका घेणे योग्य नाही, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही ठाकरे बंधूंच्या सभा का झालेल्या नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांची त्यांची बाजू मांडली. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
आमचं काम खूप आधीपासून सुरुच आहे. तुम्हाला बाहेरुन वाटतो तेवढाच प्रचार नसतो, आतून बऱ्याच गोष्टी आणि कामं सुरु असतात. अनेक लोक मतदारसंघात आधीपासून काम करत असतात. माझ्या मते निवडणुकीची वातावरणनिर्मिती झाली आहे. मला 29 महानगरपालिकांचं माहिती नाही. पण मुंबई आणि ठाण्यात आमची तयारी झाली असून योग्य पद्धतीने गोष्टी सुरु आहेत. मी इतर महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो. त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो नाही.
पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांमध्ये फरक आहे. पूर्वी सोशल मिडिया नव्हता. त्यावेळी लोक रस्त्यावर उतरुन राग व्यक्त करायचे. आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करतात. त्यामुळे लोकांच्या मनात राग आहे, जे चाललंय त्याबद्दल चीड आहे, ती 15 तारखेला मतदानाच्या दिवशी निश्चित दिसेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
साधारण 31 डिसेंबरला लोक सुट्ट्यांसाठी बाहेर जातात, ते 4-5 तारखेला परत येतात. मग 5 जानेवारी ते 13 जानेवारी असे फक्त आठच दिवस प्रचाराला मिळतात. मग इतक्या कमी काळात प्रचार कसा शक्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा असल्याने 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या, अशी चर्चा आहे. 15 तारखेला मतदान, 16 तारखेला निकाल आणि मुख्यमंत्री 17-18 तारखेला दावोसला जाणार. याचा अर्थ या निवडणुका मॅचफिक्स करुन घेतलेल्या आहेत का? इतका आत्मविश्वास येतो कुठून, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Mumbai Election 2026: निवडणुकांचा असा पॅटर्न मी कधी पाहिलाच नाही: राज ठाकरे
महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण उशीरा जाहीर झाले. त्यामुळे कोणत्या भागात कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा, हे विरोधी पक्षांना ठरवता आले नाही. निवडणूक आयोगाने अनेक दिवस मतदारसंघाच्या याद्याच दिल्या नाहीत. कधी निवडणुका डिसेंबरमध्ये होतील, कधी मार्चमध्ये होतील, अशी चर्चा होती. अशाप्रकारचं अनिश्चिततेचं वातावरण आणि निवडणुकीचा पॅटर्न यापूर्वी मी कधीच पाहिलेला नाही. पूर्वी ठरवलेल्या वेळी निवडणुका व्हायच्या. काय चाललंय तेच कळत नाही. काही महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग करण्याची गरज काय होती? ज्यांच्या हातात सत्ता असते ते बऱ्याच आधीपासून या गोष्टी करतात. त्यामुळे सत्ता नसलेल्यांन बेसावध ठेवता येते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आणखी वाचा























