(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election 2022 : आम आदमी पार्टीकडे सर्वांनी नाकारलेले नेते, ते सत्तेत आल्यास विकास होणार नाही : चरणजीत सिंह चन्नी
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल हे सतत खोटे बोलतात, ते सत्तेत आल्यास पंजाबचा विकास होणार नसल्याचे चन्नी म्हणाले.
Punjab Election 2022 : पंजाबमध्ये काल विधानसभेच्या सर्वच जागांसाठी (117) मतदान झाले. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चन्नी हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मतदारसंघातून विजयाचा दावा चन्नी यांनी केला आहे. तसेच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील चन्नी यांनी टीका केली आहे. काँग्रेसऐवजी आप सत्तेत आल्यास कोणताही बदल किंवा विकास दिसणार नाही. आम आदमी पक्षाकडे सर्वांनी नाकारलेले राजकीय नेते आहेत, असे चन्नी म्हणाले. तसेच केजरीवाल हे सतत खोटे बोलतात असेही चन्नी यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल हे क्रांतीकारक नाहीत किंवा भगसिंग यांचे शिष्यही नाहीत ते सतत खोटे बोलत असतात. तसेच अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यावरुन ते यूटर्न घेतात बऱ्याव वेळेला ते माफी देखील मागतात असेही चन्नी यांनी म्हटले आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्वांच्या राजकीय भविष्याचा फैसला 10 मार्चला होणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेस, आप, एसएडी-बसपा युती, भाजपा-पीएलसी-एसएडी (युनायटेड) आणि संयुक्त समाज मोर्चा यांच्यात बहुरंगीय लढत झाली आहे.
या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान, काँग्रेसच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रकाश सिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे. तर आम आदमी पार्टीने देखील विजय होणार असल्याचे सांगितले आहे. भाजपने देखील या निवडणुकीच्या निमित्तीने जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी पंजाबमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, पंजाबची सत्ता कोण राखणार हे येत्या 10 मार्चला समजणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: