Election 2022 : पंजाबमध्ये 65.32 टक्के तर यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी 60.46 टक्के मतदान, 1 हजार 931 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
उत्तर प्रदेशात काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर पंजाबमध्ये सर्वच जागांसाठी मतदान झाले. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले. तर यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 60.46 टक्के मतदान झाले.
Election 2022 : सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये काल उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर पंजाबमध्ये सर्वच जागांची मतदान प्रक्रिया काल पार पडली. पंजाबमध्ये एकूण 65.32 टक्के मतदान झाले. तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 60.46 टक्के मतदान झाले. सकाळी मतदान कमी प्रमाणात झाले होते मात्र, दुपारनंतर उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये वेगाने मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमध्ये 59 जागांसाठी 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे.
पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी 49.31 टक्के होती. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 48.81 टक्के, तर पंजाबमध्ये रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 49.81 टक्के मतदान झाले. यानंतर बहुतांश ठिकाणी मतदानाचा वेग वाढला आणि पुढील दोन तासात हा आकडा मोठ्या प्रमाणात पोहोचला. सर्वच ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
पंजाबमध्ये या दिग्गजांकडे सर्वांच्या नजरा
पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी एकूण 1304 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये 93 महिला उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी पंजाबमध्ये काँग्रेस, आप, एसएडी-बसपा युती, भाजपा-पीएलसी-एसएडी (युनायटेड) आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संयुक्त समाज मोर्चा यांच्यात बहुरंगीय लढत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान, काँग्रेसच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रकाश सिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या सर्व दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. 10 मार्च रोजी या सर्व निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- के. चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह, पण.... : नाना पटोले
- महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ ; वर्षा बंगल्यावरून के. चंद्रशेखर राव यांचा भाजपवर निशाणा