नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली, सरकार स्थापनेचा केला दावा
एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची एनडीए संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी आपली पंतप्रधान पदी नियुक्ती केल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राष्ट्रपतींनी मोदींना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांची नावे आणि राष्ट्रपती भवनातील शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितली आहे.
देशातील जनतेने भाजप आणि मित्रपक्षांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. या जनादेशासोबत जनतेच्या आशा-अपेक्षा जोडलेल्या आहेत. नव्या भारताच्या निर्माणासाठी प्रयत्न करणार असून ही आपल्यासाठी मोठी संधी आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
Exercising powers vested in him under Article 75 (1) of the Constitution of India, President Kovind, today appointed @narendramodi to the office of Prime Minister of India pic.twitter.com/xrs5jgCGkF
— President of India (@rashtrapatibhvn) May 25, 2019
देशातील जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करु, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं. तसेच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धारणेने जनतेची कामं करु असंही मोदींनी सांगितलं. सर्वांची सुरक्षा आणि देशाच्या समृद्धी सोबत आपल्याला पुढे जायचं आहे. मी पुन्हा एकदा देशातील जनतेला आश्वासन देतो की, आमचं सरकार सर्वांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असं मोदींनी सांगितलं.
एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.