Muslim Voters Vote To Thakceray: उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभी राहिली नवी ताकद, मुंबईत मुस्लिम व्होटबँकेकडून भरभरुन मतदान, लोकसभेतील मताधिक्याचे हादरवणारे आकडे!
Muslim Vote Bank Vote To Uddhav Thackeray: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे किंग ठरले. पण त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंसाठी कैवारी ठरले मुस्लिम समाजाचे मतदार.
Mumbai Muslim Voters Vote To Uddhav Thakceray : मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर झाला. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांनी (Maharashtra lok Sabha Result) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्राय महाविकास आघाडीचाच (Maha Vikas Aaghadi) दणका पाहायला मिळाला आहे. राज्यात महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला आहे. तर, महायुतीच्या (Mahayuti) शिलेदारांना 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. 2019 मध्ये महाराष्ट्रात 23 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभेत केवळ 9 जागाच मिळाल्या आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी काँग्रेसला 13, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्यात. यंदाच्या निवडणुकीत किंग मेकर ठरले ते उद्धव ठाकरे, संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंचीच हवा पाहायला मिळाली. मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागांवर ठाकरेंना विजय मिळाला आहे. तर, एका जागेवर ठाकरेंच्या शिलेदाराला केवळ 48 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंसाठी कैवारी ठरले मुस्लिम समाजाचे मतदार.
यंदाची लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशातच यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपानं नवा मतदार मिळाला आहे. याच मुस्लिम समाजाच्या मतदारामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी झाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूनं ठामपणे उभे राहिल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. दुसरीकडे, उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत, ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळायचा. मात्र आता शिवसेना दोन गटांत विभागली असून ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव यांच्या नव्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांनी भरभरुन पाठिंबा दिल्याचं यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. यंदाची लोकसभा निवडणूक याच गोष्टीचा पुरावा असल्याचं पाहायला मिळालं. भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द-शिवाजी नगर, अणुशक्ती नगर, कुर्ला चांदिवली, घाटकोपर पश्चिम, मालाड, मालवणी या मुस्लिम बहुल भागांतील मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान केल्याचं निवडणूक निकालांतील आकड्यांवरुन पाहायला मिळालं आहे.
ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईतील विजयी उमेदवार अरविंद सावंतांना मुस्लिम समाजाचा पाठींबा
दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. शिंदेंच्या उमेदवार यामिनी जाधव मुस्लिम आपल्या पाठीशी असल्याचा दावा सातत्यानं करत होत्या. मात्र अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं सलग तिसरा विजय मिळवला. अरविंद सावंत यांना 52 हजार 673 मतांनी विजय मिळाला. सावंत यांच्या विजयात भायखळा, मुंबादेवीच्या मुस्लिम समाजाच्या मतदारांचा मोठा वाटा आहे. मुस्लिमबहुल भायखळ्यात अरविंद सावंत यांना 86 हजार 883 मतं मिळालीत, तर जाधव यांना 40 हजार 813 मतं मिळाली आहेत. म्हणजेच, भायखळा, मुंबादेवीमधून अरविंद सावंतांनी तब्बल 46 हजार 70 मतांचा लीड घेतला आहे.
मुस्लिमबहुल मुंबादेवी विधानसभेतून काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत, तिथून अरविंद सावंत यांना 77,469 मतं मिळाली, तर जाधव यांना केवळ 36 हजार 690 मतं मिळाली. या दोन्ही मुस्लिम बहुल विधानसभा जागांमुळे अरविंद सावंत यांचा विजयाचा रस्ता अगदी सोपा झाला.
दलित, मुस्लिम बहुल धारावीतून ठाकरे यांच्यावर मतांचा वर्षाव
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना तिकीट देण्यात आलं होतं. यापूर्वी शिवसेनेचे राहुल शेवाळे या मतदारसंघातून दोन वेळा लोकसभा खासदार होते, तर यंदाही ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी मोठा विजय मिळवत विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचा दारुण पराभव केला. दक्षिण मध्य मतदारसंघात असलेला अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात तसा शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळेंचा बोलबाला असल्याचं बोललं जात होतं. अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक असून, तिथून ठाकरेंचे शिलेदार अनिल देसाई यांना तब्बल 79 हजार 767 मतं मिळालीत. तर राहुल शेवाळे यांना 50 हजार 684 मतं मिळाली आहेत. तसेच, दलित आणि मुस्लिम बहुल धारावी विधानसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना 76 हजार, 677 मतं, तर शेवाळे यांना 39 हजार 520 मतं मिळालीत. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा 53 हजार 384 मतांनी पराभव केला.
अबू आझमींच्या विधानसभेतूनही ठाकरेंनाच भरघोस मतं
ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना 29 हजार 861 मतं मिळालीत. त्यांच्या विजयात मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेच्या मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना तब्बल 1 लाख 16 हजार 072 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना केवळ 28 हजार 101 मतं मिळाली आहेत. म्हणजेच, संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात 87 हजार 971 मतांचा फरक होता. हाच विधानसभा मतदारसंघ संजय दिना पाटील यांच्या विजयाचं कारण ठरला. येथील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आहेत.
अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील कडवी झुंज
भाजप नेते राम कदम हे घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत. घाटकोपर पश्चिम विधानसभेत मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे, जिथे संजय दिना पाटील यांनी 15 हजार 772 मतांनी आघाडी घेतली. या फरकानंतर काँग्रेसमध्ये नवा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. एवढ्या मोठ्या मताधिक्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राम कदमांना धूळ चारण्याचा रस्ता सोपा झाल्याचं काँग्रेसचं मत असल्याचं कळतंय. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 46 मतांनी पराभव झाला. जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे रवींद्र वायकर हे शिंदे सेनेचे उमेदवार होते. त्यांच्याच विधानसभेत अमोल यांनी वायकर यांचा पराभव केला. मुस्लिम बहुल भागात वायकर यांना 72 हजार 119 मतं तर किर्तीकर यांना 83 हजार 401 मतं मिळाली.
काँग्रेसलाही मुस्लिम समाजाकडून भरघोस मतं
उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकमांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. इथेही वर्षा गायकवाडांच्या विजयामागे मुस्लिम समाजाच्या मतदारांचा मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळालं. वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकमांचा 16 हजार 514 मतांनी पराभव केला. कुर्ला, चांदिवली, वांद्रे पूर्व आणि वांद्रा पश्चिम विधानसभा गायकवाड विरुद्ध निकम लढतीत गेम चेंजर ठरल्या हे आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. चांदिवली विधानसभेत वर्षा गायकवाड यांना 1 लाख 2 हजार 985 मतं मिळातील, तर निकम यांना 98 हजार 661 मतं मिळाली. कुर्ला विधानसभेत वर्षा गाकवाड यांना 82 हजार 117 तर निकम यांना 58 हजार 553 मतं मिळाली. कुर्ल्यातून शिंदे सेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत. ठाकरे कुटुंबाचे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रा पूर्व विधानसभेत वर्षा गायकवाड यांना 75 हजार 13 मतं मिळालीत आणि निकम यांना 47 हजार 551 मतं मिळाली. कलिना विधानसभेतही मुस्लीम समाजानं आपलं मोठं योगदान दिलं. या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना 67 हजार 620 मतं मिळाली, तर निकम यांना 51 हजार 328 मतं मिळाली. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात, मालाड पश्चिम विधानसभेत काँग्रेसचे भूषण पाटील यांची केवळ वाढ झाली आहे. आमदार अस्लम शेख यांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या भूषण पाटील यांना 88 हजार 275 तर गोयल यांना 87 हजार 440 मतं मिळाली. उर्वरित पाच विधानसभांमध्ये भाजपचे पीयूष गोयल यांनी आघाडी घेतली.
मतांच्या विभाजनामुळे छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंचा विजय निसटला
छत्रपती संभाजी नगरमध्ये लोकसभेच्या जागेवर मुस्लिमांमध्ये फूट पडली. त्याचा फायदा शिंदे सेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना झाला. भुमरे यांना 4 लाख 76 हजार 130 तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 3 लाख 41 हजार 480 मतं मिळाली. उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे यांना 2 लाख 93 हजार 450 मतं मिळाली. याठिकाणी मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यानं या ठिकाणी शिंदेंचे संदीपान भुमरे विजयी झाल्याची चर्चा आहे.
उत्तर भारतीयांचीही भाजपकडे पाठ, ठाकरेंची दिली साथ
लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांनीही यंदाच्या निवडणुकीत भाजपकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांची भाजपसोबतची युती उत्तर भारतीय मतदारांना फारशी पटल्याचं दिसलं नाही. उत्तर भारतीय मतदारांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे उमेदवार वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. दिंडोशी, वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. दिंडोशी विधानसभेतून ठाकरेंचे शिलेदार कीर्तिकर यांना 77 हजार 469 तर वायकर यांना 75 हजार 768 मतं मिळाली. म्हणजेच, कीर्तिकर यांना येथून केवळ १ हजार 701 मतं जास्त मिळाली, तर वायकर यांना येथून मोठी आघाडी मिळायला हवी होती, पण तसं झालं नाही.
कीर्तीकर यांना वर्सोवा विधानसभेतही जास्त मतं मिळाली. इथून कीर्तिकर यांनी तब्बल 80 हजार 487 तर वायकर यांनी 59 हजार 397 मतं काढली. या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा मोठा वर्ग ठाकरेंकडे गेल्याचं दोन विधानसभा मतदारसंघातून स्पष्ट झालं आहे. अंधेरी पूर्व विधानसभेत वायकर यांना मोठी आघाडी मिळायला हवी होती, पण ती मिळाली नाही. इथून वायकर यांना 78 हजार 764 आणि कीर्तिकर यांना 68 हजार 646 मतं मिळाली. गोरेगाव विधानसभेतील उत्तर भारतीयही शिंदेंकडे गेले आहेत. भाजपच्या विद्या ठाकूर या तिथल्या आमदार आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकडेही उत्तर भारतीय मतदार वळल्याचं पाहायला मिळालं. तसेच, उत्तर मध्य लोकसभेत उत्तर भारतीय मतदारांचा कल शिंदे सेनेकडे गेला आहे. चांदिवली विधानसभेचे उत्तर भारतीय मतदार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही उत्तर भारतीयांकडून मोठं मताधिक्य मिळाल्याचं पाहायला मिळालं.