वरळीत आदित्य ठाकरेंना सेफ करण्यासाठी माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंची वाट मोकळी करण्याची खेळी?
Amit Thackeray Mahim Vidhansabha Election 2024: अमित ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.
Amit Thackeray Mahim Vidhansabha Election 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा 'एकला चलो रे'चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
शिवतीर्थवर झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मनसे नेत्यांकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम विधानसभा मतदारसंघामधून (Mahim Vidhansabha Election 2024) उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या संदर्भात राज ठाकरे कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान अमित ठाकरे यांच्या उमेदवारी संदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. जर राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी दिली, तर अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार देऊ नये, असा मतप्रवाह आहे. तर अमित ठाकरेंविरोधात माहितीमधून ठाकरे गटाने उमेदवार न देण्याच्या चर्चा म्हणजे वरळीबाबत बार्गेनिंग करणं आहे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.
एबीपी माझाशी बोलताना संदीप देशपांडे नक्की काय म्हणाले?
अमित ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. अजून त्याबाबत निर्णय घेतलेला नाही आणि अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबत देखील राज ठाकरे निर्णय घेतील. अमित ठाकरेंनी माहीमधून निवडणूक लढवल्यास ठाकरे गटाकडून या जागेवर उमेदवार देऊ नये आणि मनसेने देखील वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी ठाकरे गटात सध्या चर्चा रंगली आहे. यावर संदीप देशपांडे म्हणाले की, वरळीमध्ये ठाकरे गटात भिती निर्माण झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे त्यांना प्रस्ताव सुचत आहे. जेव्हा आमचे अमित ठाकरे आजारी होते, तेव्हा आमचे 7 नगरसेवक त्यांनी चोरले. तसेच 2019 च्या निवडणूकीत आम्ही वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. तेव्हा आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, अशी आठवणही संदीप देशपांडेंनी करुन दिली. तसेच मात्र आता राज ठाकरेंनी निर्णय घेतला तर ठीक, नाहीतर तडजोड नाही. बार्गेनिंग ठाकरे सेना आता घाबरली आहे, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेच्या उमेदवारांची यादी
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर