(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra vidhansabha Results सोलापुरात वेगळीच लाट, मविआचा षटकार, काँग्रेस, शिंदे शिवसेना अन् अजित पवारांची राष्ट्रवादी हद्दपार; निकालाची वैशिष्टे
Maharashtra vidhansabha Results यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालात राज्यात महायुतीची मोठी लाट पाहायला मिळत असून तब्बल 233 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून बहुतांश विजयी झाले आहेत.
Maharashtra vidhansabha Results सोलापूर - राज्यात महायुतीची केवळ लाट नाही, तर त्सुनामी आल्याचं आजच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे. मात्र, राज्यात केवळ 51 जागांवर आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला एकट्या सोलापूर जिल्ह्यातून 6 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली असून काँग्रेसने महाविकास आघाडीच्या (MVA) माध्यमातून जिल्ह्यात तीन जागा लढवल्या होत्या, मात्र येथील मतदारसंघातील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यातून विधानसभेला काँग्रेस हद्दपार झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शहाजी बापू पाटील, करमाळ्यातून संजय मामा शिंदे, माळशिरसमधून राम सातपुते, मोहोळमधून यशवंत माने आणि बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला आहे. तर, देवेंद्र कोठे, सोलापूर मध्य, राजु खरे मोहोळ, बाबासाहेब देशमुख, सांगोला, उत्तम जानकर, माळशिरस, आणि माढ्यातून अभिजीत पाटील हे 6 जण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यात वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात महायुतीची लाट असताना, सोलापुरात महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालात राज्यात महायुतीची मोठी लाट पाहायला मिळत असून तब्बल 233 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून बहुतांश विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीला केवळ 51 जागांवर आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या 51 जागांपैकी 6 जागा एकट्या सोलापूर जिल्ह्यातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची वेगळीच लाट पाहायला मिळाली. विशेष म्हणजे गत 2019 च्या निवडणुकीत भाजप महायुतीला चांगलं यश मिळालं होतं. मात्र, यंदा जिल्ह्यातून काँग्रेस, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढलेले माजी मंत्री दिलीप सोपल (शिवसेना ठाकरे), उत्तम जानकर (राष्ट्रवादी शरद पवार), नारायण पाटील (राष्ट्रवादी शरद पवार), बाबासाहेब देशमुख (शेकाप), माढ्यातून अभिजीत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) आणि मोहोळमधून राजू खरे (राष्ट्रवादी शरद पवार) यांचा विजय झाला आहे. त्यामुळे, 6 पैकी 4 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत, तर एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल आणि एका जागेवर शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील निकालाची वैशिष्टे
सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी
सोलापूर जिल्ह्यातून 6 नवे चेहरे पहिल्यांदाच विधानसभेत जाणार
सोलापूर मध्य विधानसभेत काँग्रेसच्या चेतन नरोटे, माकपच्या नरसय्या आडम या दोघांचेही ही डिपॉजिट जप्त
सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचेही डिपॉजिट जप्त
माजी आमदार बबनदादा शिंदे आणि कुटुंबीय पहिल्यांदाच मतदारसंघाच्या सत्तेतून बाहेर
स्व. गणपत देशमुख यांचे गड समजला जाणारा सांगोला मतदार संघ त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी परत मिळवला.
राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही आमदार सोलापूर जिल्ह्यात नाही.
मागच्या वेळी शिंदे गटाचे 1, अजित पवार गटाचे 3 आमदार जिल्ह्यात होते.
हेही वाचा
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'