Dilip Walse Patil: आंबेगावमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार, मानसपुत्राच्या विरोधातच घेणार जंगी सभा, पवारांच्या सभेकडं राज्याचं लक्ष
Dilip Walse Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार आज सभा घेत आहेत. त्यामुळं आज पवार काय बोलतात याकडे मानसपुत्र दिलीप वळसेंचे लक्ष लागलं आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे शरद पवारांचे (Sharad Pawar) मानसपुत्र मानले जातात. वळसे पाटील सलग सात वेळा आंबेगाव मतदारसंघातून आमदार झालेत, त्यावेळी शरद पवारांनी त्यांचा प्रचार केला. मात्र, यंदा वळसेंच्या विरोधात उभे ठाकलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार आज सभा घेत आहेत. त्यामुळं आज पवार काय बोलतात याकडे मानसपुत्र दिलीप वळसेंचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शरद पवार साहेब काय बोलतात, यावर प्रचाराची पुढची रणनीती अवलंबून असेल. असे संकेत वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिले आहेत. निकालानंतर सत्तेचं समीकरण बदलेल यासाठी मी वक्तव्य केलं नव्हतं, तर पुढचे मुख्यमंत्री कोण असतील? याला अनुसरून ते वक्तव्य होतं. असा खुलासा करताना निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नसल्याचं वळसेंनी स्पष्ट केलं. तसेच न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेल्या खुलास्यावर तत्कालीन गृहमंत्री असलेल्या वळसे पाटलांनी अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे.
नेमकं काय म्हणालेत वळसे पाटील?
शरद पवारांच्या सभेबाबत एबीपी माझाशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, राजकारणामध्ये परिस्थिती बदलत असते. लोकशाहीमध्ये एकदा आपण एखादी राजकीय भूमिका घेतली की, त्या भूमिकेमध्ये जे जे समोर येईल त्याला सामोरे जावे लागते त्यामुळे साहेबांनी सभा घेतली तर मला काय हरकत असायचे काही कारण नाही.
काही दिवसांपूर्वी सत्तांतरासाठी काही गणित मांडावी लागतील काही समीकरण मांडावी लागतील आपण महत्वाची भूमिका बजावू शकता, हे त्यांचं काही दिवसांपुर्वीचं वक्तव्य खूप चर्चेत आहे, त्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'मी बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी जनरल बोलत होतो की, या निवडणुकीमध्ये दोन आघाड्या एकमेकांच्या विरुद्ध लढतात आणि त्यामुळे प्रत्येक आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत आणि महायुती देखील तीन पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला किती सीट मिळतील. प्रत्येक पक्षाला बहुमत मिळवण्या इतक्या सीट मिळतील हा मुख्य प्रश्न आहे. त्यावेळी पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता की राज्याचा मुख्यमंत्री कोण बनेल, त्यावेळी त्याला मी असं उत्तर दिलं होतं राज्याचा मुख्यमंत्री निवडणूक झाल्यावर सीट निवडून आल्यावर प्रत्येक पक्षाचं बलाबल होईल त्याच्या आधारे मग सरकार बनेल त्यानंतर मुख्यमंत्री ठरेल ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री ही भूमिका दोन्ही आघाड्यांनी घेतलेली आहे.