Sanjaykaka Patil : भाकरी फिरली... भाजपचे संजय काका अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; रोहित पाटलांविरुद्ध शड्डू ठोकला
Sanjaykaka Patil : भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजितपवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Sanjaykaka Patil : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं स्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency) मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळतोय. कारण भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. तसेच आता तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात स्वतः संजयकाका उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्याविरोधात महायुतीकडून एक तगडं आव्हान उभं केलं जातंय.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सध्या सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकासआघडीमध्ये बराच काथ्याकुट होतोय. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक जागांची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची लढत असते. त्यातच आता तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेत भाकरी फिरल्याने विधानसभेच्या मैदानाकडे सांगलीकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण आर.आर पाटलांपासूनच ही दोन्ही पाटील घराणी राजकीय वर्तुळात तशी बरीच गाजली आहे.
पाटील विरुद्ध पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 29 ऑक्टोबर रोजी संजयकाका विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सांगलीच्या महत्त्वाच्या मतदारसंघात पुन्हा एकदा पाटील विरुद्ध पाटील अशी लढत पाहायला मिळेल. तसा पाटील विरुद्ध पाटील ही लढत सांगलीकरांसाठी काही नवीन नाही. मागील अनेक वर्षांपासून या घराण्यांतील राजकीय वाद हे कायमच पटलावर राहिले आहेत.
संजयकाका पाटील हे सांगलीच्याच मैदानातून लोकसभेच्याही रिंगणात होते. पण विशाल पाटलांनी सांगलीच्या लोकसभेचं मैदान मारलं आणि महाविकासआघाडीचं पारडं जड केलं. आता त्याच संजयकाका पाटलांनी विधानसभेसाठीही रणशिंग फुंकलंय. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांपूर्वी पदरी निराशा पडल्यानंतर विधानसभेला संजयकाका सांगलीकरांची आणि कवठे-महाकाळ मतदारसंघातील जनतेची मनं जिंकणार की रोहित पाटील बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कवठेमहांकाळ मधील अजितराव घोरपडे ही अजित पवार गटासोबतच आहेत. त्यामुळे अजितराव घोरपडे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. म्हणूनच आता सांगलीकरांना पुन्हा एकदा एक प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार का? याची उत्सुकता असेल.
ही बातमी वाचा :
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 45 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात