Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जिण नाही; ठाकरे, मुंडेंनंतर आता पवार vs पवार
Maharashtra NCP Political Crisis : काका पुतण्याचा वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कारण राज्यात काका आणि पुतण्याचे वाद कायमच चर्चेत असतात.
![Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जिण नाही; ठाकरे, मुंडेंनंतर आता पवार vs पवार Maharashtra NCP Political Crisis Sharad Pawar Vs Ajit Pawar munde Thackeray and many more latest Marathi news update Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जिण नाही; ठाकरे, मुंडेंनंतर आता पवार vs पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/737d7f1ddae29df2ae8700fa2f5295ae1688300113045614_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra NCP Political Crisis : काका पुतण्याचा वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कारण राज्यात काका आणि पुतण्याचे वाद कायमच चर्चेत असतात. राजकीय संघर्षामुळे अशा अनेक काका पुतण्याच्या वादाची कहाणी राज्याने पाहिल्या आहेत. कधी पुतण्या काका वर नाराज असतो, मग त्याची नाराजी काढली जाते. समेट होतो आणि तो विषय काही काळासाठी बाजूला पडतो. तर कधी पुतण्या बंड करतो आणि आपली वेगळी चूल मांडतो. सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या लढाईने खळबळ माजवली आहे. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी धरत शरद पवारांच्या विरोधात जात सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका आणि पुतण्याच्या वादाला सुरुवात झाली आहे. याआधीही काका आणि पुतण्यामध्ये राजकीय मतभेद झाले आहेत. ठाकरे, मुंडे, देशमुख अशी बरीच मोठी यादी आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे
बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेना कुणाकडे सोपवायची...राज की उद्धव हा प्रश्न होता... बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंची निवड केली त्यांना कार्याध्यक्षपद दिलं.. शिवसेनेचे महाबळेश्वरच्या कार्यकारणीत हा निर्णय झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंचं नाव राज यांनीच सुचवलं होतं.. पण नंतर राज ठाकरेंच्या नाराजीचा स्फोट होत गेला आणि शेवटी त्याची परिणती त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्यात झाली. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केला. शिवसेनेतून पहिल्यांदा एक ठाकरे बाहेर पडले. महाराष्ट्रातील काका-पुतण्या वादाची मोठी घटना म्हणून याकडे पाहिले जाते.
गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे
बीड जिल्हात गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतणे वाद रंगला होता. धनंजय मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. धनंजय मुंडे यांच्याकडे बीडच्या राजकारणाची मोठी जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांनी सोपवली होती. गोपीनाथ मुंडे केंद्रात गेले, पण राज्यात पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर काका आणि पुतण्याच्या वादाची ठिणगी पडली. धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. धनंजय मुंडे यांनी काकाचा हात सोडत घड्याळ हातात घातले.
जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर
मुंडे काका-पुतण्याचा वाद बीडच्या जनतेने पाहिला होता, त्यानंतर बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद सुरु झाला. गेल्यावर्षी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. क्षीरसागर घराण्याने 3 वेळा खासदारकी भुषवली आहे. पण काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात सध्या वितुष्ट आहे. 2019 च्या निवडणुकीत काका आणि पुतण्यात थेट लढत पाहण्यास मिळाली. पुतण्या संदीप यांनी राष्ट्रवादीकडून तर काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला. काकाला मंत्रिपद मिळाले... त्यानंतर पुतण्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
सुनील तटकरे-अवधूत तटकरे
सध्या राष्ट्रवादीमध्ये पवार काका-पुतण्यामध्ये वाद सुरु आहेत. पण राष्ट्रवादीमध्ये याआधी आणखी एका काका पुतण्याचा वाद झाला होता. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांच्यात वाद झाला. सुनील तटकरेंनी मुलगी आदिती तटकरे यांना राजकारणात आणले तेव्हा अवधूत कमालीचे नाराज झाले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत काकापासून फारकत घेत थेट शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपात गेले.
अनिल देशमुख-आशिष देशमुख
विदर्भात देशमुख घराण्यातही काका आणि पुतण्यामध्ये राजकीय मतभेद झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुतणे आशिष देशमुख यांच्यामध्ये राजकीय मतभेद वाढले. 2014 मध्ये आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये अनिल देशमुख यांनी या पराभवाची परतफेड केली. अनिल देशमुख सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर आशिष देशमुख यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)