Ajit Pawar: नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनाच विचारा; अजित पवारांच्या सूचक वक्तव्याने भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar: सिंचन गैरव्यवहारात माझ्यावर आरोप झाल्यावर व्यथित होऊन नैतिकेला धरून मी तत्काळ राजीनामा दिला होता, असे सांगत पवार यांनी राजीनाम्या बाबतच्या निर्णयाचा चेंडू धनंजय मुंडेच्या अंगावर टाकला आहे.

Ajit Pawar: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरती अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा पुरावा देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांकडे दिला आहे, त्याचबरोबर वारंवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अनेक वेळा राजीनाम्याच्या मुद्यांवरून अजित पवारांनी मुंडेंना पाठिशी घातल्याच्या चर्चा होत्या अशातच अजित पवारांनी काल(रविवारी) केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविषयीचे पुरावे आमदार सुरेश धस यांनी सादर केले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप आरोप सिद्ध झालेला नाही किंवा चौकशीचा बाण त्यांच्याकडे रोखलेला नसताना त्यांचा राजीनामा का घ्यायचा," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण केली. मात्र त्याचवेळी, सिंचन गैरव्यवहारात माझ्यावर आरोप झाल्यावर व्यथित होऊन नैतिकेला धरून मी तत्काळ राजीनामा दिला होता, असे सांगत पवार यांनी राजीनाम्या बाबतच्या निर्णयाचा चेंडू धनंजय मुंडेच्या अंगावर टाकला आहे.
काल (रविवारी,16) नाशिकमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, बीड येथील घटना निर्दयी आहे. असे काही तरी कुणी करू शकते, हे सहनच होत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आम्ही कोणालाही वाचवत नाही. त्यासाठी लोकांनी महायुतीचे 237 आमदार निवडून दिले नाहीत. जनतेसाठी आम्हाला काम करावेच लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आरोपांमुळे मी व्यथित झालो त्यामुळे मी...
नैतिकतेच्या आधारे राजीनामा का घेतला जात नाही, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "मी 34 वर्षे विविध खाती सांभाळली आहेत. स्वच्छपणे कारभार केला, तरीही सिंचन गैरव्यवहाराचे आरोप माझ्यावरती झाले. सचिवांकडून माहिती घेऊनच मी निर्णय घेत असतो. तरीही माझ्यावर आरोप झाले, त्यामुळे व्यथित होऊन मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. देशात अनेक घटनांमध्ये पूर्वी लालबहादूर शास्त्री, आर. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यानंतर अनेक घटना घडल्या, पण कुणी राजीनामा दिल्याचे मला आठवत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे."
धस- मुंडे भेटीतील चर्चा माहिती नाही
आमदार धस आणि धनंजय मुंडे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली, त्यात नेमकी काय चर्चा झाली, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "भेट झाली हे मला दोन-तीन दिवसांनी समजले. पण, दोघांमध्ये काय चर्चा झाली, याविषयी आपणास काहीच माहिती नाही."
संदीप क्षीरसागर यांनी जुन्नरमध्ये घेतली अजितदादांची भेट
बीड जिल्ह्यात सध्या मस्साजोग प्रकरणावरून आणि एकमेकांवर आरोप करणारे नेते भेटल्याने राजकीय वर्तुळातून सध्या मोठ्या प्रमाणावर हल्लाबोत होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल (रविवारी,16) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जुन्नर येथे जाऊन भेट घेतली. या भेटीची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. जुन्नर येथील सत्र न्यायालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले होते. तेथे संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट झाली.
संदीप क्षीरसागर भेटीवर दिली प्रतिक्रिया
या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. बीड प्रकरणावरून आधीपासूनच भाजप नेते सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आधीपासून आक्रमक होते, मात्र, या भेटीने नव्या चर्चा सुरू झाल्या. या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री व बीडचा पालकमंत्री आहे. बीड शहराला 20 दिवस पाणी नाही. यातून काहीतरी मार्ग काढा, हे सांगायला क्षीरसागर आले आहेत. क्षीरसागर हे विरोधी पक्षाचे आमदार असले तरी मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना लोक मला भेटायला येणार. आम्हीही विरोधी पक्षात असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला जायचो, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
संदीप क्षीरसागर यांनी भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. बीड नगरपालिकेचा पाणीप्रश्न व इतर समस्या सांगण्यासाठी आलो होतो. मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मतावर मी ठाम असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
























