Ranjitsinh Mohite Patil : आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. त्यातच आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोमाने तयारी केली जात आहे. त्यातच शरद पवार यांच्याकडून महायुतीला एकामागे एक धक्के दिले जात आहे. त्यातच आज शरद पवार हे वाय बी चव्हाण सेंटरला इच्छुकांच्या भेटीगाठी घेत आहेत. वाय बी चव्हाण सेंटरला इच्छुकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटप फायनल होण्याची दाट शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
त्यातच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. मात्र, माध्यमांच्या भीतीपोटी रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार यांची भेट न घेता वाय बी चव्हाण सेंटर मधून निघून गेले होते. माढा विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. पण काही वेळानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा वाय बी चव्हाण सेंटर गाठून शरद पवारांची भेट घेतली आहे. आता रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडून तुतारी हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांचा अजित पवारांना धक्का
दरम्यान, अजित पवार यांचे निष्ठावंत सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना शरद पवार गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. ते लवकरच तुतारी हाती घेऊन शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. तर आदिती तटकरे यांच्यासमोर शरद पवार गटाकडून राजकीय आव्हान निर्माण केले जाणार आहे. ज्ञानदेव पवार हे आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
आणखी वाचा
नवाब मलिक, सना मलिक यांचं ठरलं! पिता-कन्या अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार