नवाब मलिक, सना मलिक यांचं ठरलं! पिता-कन्या अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते आपल्या कन्येसह निवडणूक लढवणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात राजकारणांचा फड चंगलाच रंगला आहे. पक्षांतराला पेव फुटले आहे. अनेक नेतेमंडळी तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेता सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. तर राज्यातील अनेक नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या या रणधुमाळीत माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ते यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असे विचारले जात होते. असे असतानाच आता नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक (Sana Malik) हे दोघेही विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवणार आहेत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार नबाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक हे दोघेही यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्दमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर अणुशक्ती नगरमधून सना मलिक या निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी तयारीदेखील चालू झालेली आहे. सना मलिक आणि नवाब मलिक हे दोघेही अजित पवार यांच्या पक्षाकडून म्हणजेच घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार येत्या 28 ऑक्टोबर रोजी नवाब नवाब मलिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांची कन्या सना मलिक या 23 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अज दाखल करतील.
नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत
नवाब मलिक यांना ईडीने 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ऑगस्ट 2023 जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले होते. याआधी क्रूझ ड्रग्ज प्रकरण त्यांनी चांगलंच उचलून धरलं होतं. त्यांनी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ईडीने कारवाई केल्यानंतर मात्र त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर नवाब मलिक नेमकं काय करणार? ते अजित पवार यांच्या पक्षात जाणार की शरद पवार यांच्यासोबत राहणार, असे विचारले जात होते. पण शेवटी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणं पसंद केलं. त्यानंतर आता ते याच पक्षाकडून लेकसह निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
लेकीसाठी सोडणार मतदारसंघ
नवाब मलिक यांनी 2019 साली अणुशक्तिनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी या जागेवरून शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार तुकाराम काटे यांना पराभूत केलं होतं. मलिक यांना 65217 तर काटे यांना 52466 मतं मिलाली होती. या दोघांनाही मिळालेल्या मतांची टक्केवारी अनुक्रमे 46.8 आणि 37.7 टक्के एवढी होती. 2009 सालच्या निवडणुकीतही नवाब मलिक यांनी याच जागेवरून निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. आता मात्र कन्येसाठी ते हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता आहे. सना मलिक या अणुशक्तिनगर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्दमधून येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :