(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Camp Vs MNS: मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
Ajit Pawar vs Raj Thackeray: राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरु आहे. मनसेचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक पदाधिकारी आहेत.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना महायुतीचा घटक असलेला अजित पवार गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच जाहीर सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा नाही, तो शरद पवारांचा (Sharad Pawar) आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या टीकेला अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता अजितदादा गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मनसेवर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे आणि मनसेचे इतर प्रमुख नेते काय बोलणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सुरज चव्हाण यांनी मनसेवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, मनसेचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक पदाधिकारी आहेत. जनमतापेक्षा त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, ते किती हप्तेवसुली गोळा करु शकतात, असे अट्टल गुन्हेगार टाईप पदाधिकारी असतात. तशा पदाधिकाऱ्यांची संख्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जास्त आहे. संस्कारांची कमी असल्यामुळे अनेक वक्तव्यं करुन प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात किंवा आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जातोय, असे सुरज चव्हाण यांनी म्हटले.
अमोल मिटकरी यांच्याबाबत अनेकजण धमक्या देतात. त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की, वेळ, तारीख आणि काळ त्यांनी सांगावा, आम्ही पाहिजे तिथे येऊ. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असे सुरज चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
अजित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा नसून शरद पवारांचा असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, तुमची मनसे आणि इंजिन घेऊन बसा, तुम्हाला काय करायचंय बाकीच्यांचं. आज लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. कायकर्ते, नेते, खासदार आणि आमदार मिळून पक्ष ठरवत असतात, तो कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नसतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
आणखी वाचा