अमित शाह यांच्यामुळंच महाराष्ट्राची ओळख गद्दारांचे राज्य अशी झाली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
अमित शाह (Amit Shah) यांची कराड दक्षिणमध्ये सभा होवू नये, यासाठी उमेदवार प्रयत्न करत होते. पण काहीजण अमित शह यांचा पायगुण चांगला मानतात असा टोला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
Prithviraj Chavan on Amit Shah : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले आहेत. तर बीकेसीत होणारं सेंटर गांधीनगरला कोणी पळवलं? असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. अमित शाह (Amit Shah) यांची कराड दक्षिणमध्ये सभा होवू नये, यासाठी उमेदवार प्रयत्न करत होते. पण काहीजण अमित शह यांचा पायगुण चांगला मानतात असा टोला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. अमित शाह यांच्यामुळंच महाराष्ट्राची ओळख गद्दारांचे राज्य अशी झाली असल्याची टीका देखील चव्हाण यांनी केली.
. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास अग्नीवर योजना रद्द करणार
सध्या वक्फ बोर्डाचा कायदा संसदेत विचाराधीन आहे. अग्निवर योजनेला आमचा कडाडून विरोध आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास अग्नीवर योजना रद्द करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भारताच्या सुरक्षेची खिलवाड सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. दरम्यान, आज अमित शाह यांची कराडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कराड दक्षिणमध्ये सभा होवू नये, यासाठी उमेदवार प्रयत्न करत होते. पण काहीजण शाह यां चा पायगुण चांगला मानतात असेही ते म्हणाले. अमित शाह यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना समोरासमोर चर्चेच आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडासाफ होणार, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
आज महाराष्ट्रात अमित शाह यांच्या सांगली, कोल्हापूर, सातारा अशा विविध ठिकाणी जाहीर सभा झाल्या. या सभेत त्यांनी राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आम्ही पुलवामा झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला, पण राहुल बाबा म्हणतो की याचा काही पुरावा आहे का? अरे राहुल बाबा जरा पाकिस्तानचे चेहरे टीव्हीवर बघा. हरियाणामध्ये हे आघाडी वाले फटाके घेऊन बसले होते. मात्र, त्यांनी फटाके भाजपच्या नेत्यांना दिले, तिथं सुपडासाफ झाला. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचा सुपडासाफ होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला होता. राम मंदिराचा मुद्दा 75 वर्ष काँग्रेसने भिजत ठेवला होता, पण मोदींनी पाच वर्षांमध्ये मंदिर उभा केलं आहे. राम मंदिरात शरद पवार, उद्धव ठाकरे जाणार होते, राहुल गांधी सुद्धा जाणार होते, पण यांची व्होट बँक वाचवण्यासाठी ते अजून अयोध्येला गेले नाहीत, अशी टीका अमित शाह यांनी केली.