Congress Candidate List : धारावी ते मालाड पश्चिम, काँग्रेसच्या यादीत मुंबईतील किती जागांवर उमेदवार जाहीर, चांदिवलीची जागा मिळवण्यात यश
Congress Candidate List : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीत 48 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : काँग्रेसनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमदेवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या यादीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसनं दिग्गजांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईतील 36 जागांवरुन महाविकास आघाडीच्या जागा वाटपावेळी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. काँग्रेसनं पहिल्या यादीत मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मुंबईतील धारावी, मालाड पश्चिम, मुंबादेवी आणि चांदिवलीच्या जागेवर उमेदवार देण्यात आले आहेत.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी काँग्रेसनं पहिल्या यादीत चार जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतील भायखळा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम आहे. काँग्रेसनं पहिल्या यादीत धारावी, मालाड पश्चिम, मुंबादेवी आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. धारावीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय मुंबादेवी मतदारसंघातून अमिन पटेल, मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघात नसीम खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केलेला नाही. वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळेल अशा चर्चा होत्या. मात्र, काँग्रेसच्या पहिल्या यादीत प्रिया दत्त यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
काँग्रेसनं या यादीत काँग्रेसने जवळ्पास 27 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. रावेरमध्ये शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी यांना तिकीट तर धारावीतून वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत दिग्गजांना स्थान
काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, के.सी. पाडवी. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या रवींद्र धंगेकर यांना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
मविआचे 158 उमेदवार जाहीर
मविआतील प्रमुख पक्ष असलेल्या तीन पक्षांपैकी काँग्रेसनं 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं 45 जागा तर ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार