South Mumbai Election : दक्षिण मुंबईसाठी भाजपचा प्लॅन, मराठी भागात ठाकरेंना नमवायला मनसेची साथ घेणार?
Lok Sabha Election : शिवडी आणि वरळी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याने भाजप मनसेची साथ घेणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय.
मुंबई : दक्षिण मुंबईसाठी (South Mumbai Election) भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील मराठी मतांसाठी भाजप विशेष तयारी करतंय. भाजपकडून चेहऱ्यांची पडताळणी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील मतदारांचा अभ्यास केला तर भाजप मनसेने परस्पर सहकार्याने निवडणूक लढवल्यास ठाकरेंचा बालेकिल्ला सर करणे भाजपसाठी सहजशक्य होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून मुंबईतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलंय. यासाठी भाजपने अंतर्गत मोर्चेबांधणी देखील सुरू केलीय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिलाय. नुकतीच भाजपने या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचीही माहिती मिळतेय.
भाजप मनसेसोबत युती करणार?
ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजपने मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची साथ घेतली तर नवल वाटायला नको. त्यातच भाजप मनसे युतीच्या चर्चांना देखील काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती.
मागील काही दिवसापासून मनसे-भाजपची जवळीक वाढल्याची देखील चर्चा आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तसे संकेतही दिलेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल असे सांगत आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री असल्याचे सांगितले. हे सगळं बघता जर मनसे महायुतीत आल्यास दक्षिण मुंबईसाठी भाजपला मनसेचा फायदा होईल.
मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल. माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे. बाळा नांदगावकर यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होईल. असं असलं तरीही लोकसभा मतदारसंघासाठी मागील चार महिन्यापासून भाजपला उमेदवार मिळत नाही, ते इकडे तिकडे बघत असल्याची टीका ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांनी केलीय.
एकूणच काय भाजपने उबाठा गटाकडे असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जिकण्यासाठी दोन हात आतापसूनच केलेत असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आता भाजपला या मतदारसंघात विजयी व्हायचं असेल तर भाजप नेमका कोणता चेहरा उतरवणार आणि मनसेची साथ घ्यायची झाली तर ती कशी घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचे असेल.
ही बातमी वाचा: