Karnataka Election Results 2023 : काँग्रेसच्या यशात राहुल गांधींचा महत्त्वाचा वाटा, अशी जिंकली कर्नाटकाच्या जनतेची मनं!
Karnataka Election: कर्नाटकाच्या निवडणुकीतील घवघवीत यशाचं श्रेय राहुल गांधी यांना देखील जातं. भाजपाच्या अनेक गंभीर आरोपानंतर देखील त्यांनी कर्नाटकाच्या जनतेची मनं जिंकली आहेत.
Karnataka Election: कर्नाटक विधानसभा 2023 (Karnataka Election) च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर पक्षात आनंदाचे वातावरण आहे. मागील काळात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेली काँग्रेसची परिस्थिती पाहता काँग्रेसचा हा मोठा विजय झाल्याचं मानलं जात आहे. भाजपाने जरी गांधी कुटुंबावर अनेक आरोप केले असले, तरीही या परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा विजय हा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मेहनतीचं फळ मिळालं असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनी यावेळी कर्नाटकातील काँग्रेसच्या यशासाठी बरीच मेहनत घेतली होती. राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) देखील या निवडणुकांवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, "या विजयामध्ये भारत जोडो यात्रेचा देखील वाटा आहे." तसेच कर्नाटकात जिथे जिथे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पोहचली तेथे काँग्रेसचा विजय झाला असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं.
जोरदार पावसांत केलं भाषण
'भारत जोडो यात्रे'ने कर्नाटकाच्या शहरी भागांबरोबर ग्रामीण भागात देखील प्रवेश केला. तसेच कर्नाटकातील मैसूरमध्ये राहुल गांधींनी भर पावसात भाषण केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं की, "भाजपा आणि आरएसएसने पसरवलेल्या हिंसेला संपवून टाकण्याचा या यात्रेचा हेतू आहे. उष्णता, थंडी, वादळ कोणत्याही प्रकारचं संकट या यात्रेला थांबवू शकत नाही." त्यामुळे राहुल गांधींची ही प्रतिमा कर्नाटकातील जनतेच्या मनात अधिक काळासाठी राहिल असं म्हटलं जात आहे.
भारत जोडो यात्रेत भावनिक संदेश
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील काँग्रेच्या विजयाचं श्रेय गांधी परिवाराला दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, "सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे त्यामुळे त्याचं श्रेय देखील त्यांना जातं." सोनिया गांधी देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यादरम्यान त्या भावूक देखील झाल्याचं पाहायला मिळालं. यात्रेदरम्यान एका ठिकाणी त्यांनी सोनिया गांधी यांच्या बुटाची नाडी देखील राहुल गांधी यांनी बांधल्याचं चित्र पाहायला मिळालं. काँग्रेसने दिलेल्या सर्व भावनिक संदेशांचा परिणाम या निवडणुकांमध्ये झाल्याचं काँग्रेच्या विजयानंतर स्पष्ट झालं आहे.