Goa Election Result 2022: बंडखोर उत्पल पर्रिकर भाजपचा अभेद्य किल्ला भेदणार?
Goa Election Result 2022: गोवा विधानसभा निवडणुकीतील सर्वांच्या नजरा वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे पणजी. उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून मैदानत उतरले आहेत.
Goa Election Result 2022: पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासात जाहीर होणार आहे. या निवडणुकीतील सर्वांच्या नजरा वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे पणजी. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून मैदानत उतरले आहेत. उत्पल यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने आपला उमेदवार उतरवलेला नाही. उत्पल यांचे वडील मनोहर पर्रिकर पणजी मतदारसंघातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
परंतु भाजपने या मतदारसंघातून अतानासियो मोन्सेरात यांना तिकीट दिलं आहे. तर एल्विल गोम्स हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आतापर्यंत पणजी मतदारसंघ हा भाजपचा गड समजला जात होता. पण या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही वेळात स्पष्ट होईल. सध्यातरी पणजीमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ उत्तर गोवा जिल्ह्यात येतो. या मतदारसंघातून सात वेळा भाजपचाच उमेदवार जिंकला आहे.
...म्हणून उत्पल पणजी मतदारसंघासाठी आग्रही होते!
उत्पल यांच्यामुळे पणजी मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्पल यांना त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक जागेवर निवडणूक लढवायची होती. त्यामुळेच तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्पल यांचे वडील मनोहर पर्रिकर यांची या जागेवर मजबूत पकड होती. पर्रिकर येथून सहा वेळा आमदार होते. 1994 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1994, 2002, 2007, 2012 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये पर्रिकर यांना केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. मात्र, नंतर राज्यात सरकार स्थापनेत पेच निर्माण झाल्यावर पर्रिकर गोव्यात परतले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. पर्रिकर चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते.
2017 नंतर या जागेवर दोन वेळा पोटनिवडणूक
2017 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ श्रीपाद यांनी पणजी विधानसभेची जागा जिंकली आणि ते आमदार झाले. त्यांनी युनायटेड गोवा पक्षाचे अटानासियो जे. मोनसेरेट यांचा 1,069 मतांनी पराभव केला होता. काही काळाने सिद्धार्थ श्रीपाद यांनी मनोहर पर्रिकरांसाठी ही जागा सोडली. 2017 च्या पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेसचे गिरीश चंदनकर यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये पर्रिकर यांच्या निधनानंतर या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक झाली. त्यानंतर अतानासियो जे मोन्सेरात यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि ते आमदार म्हणून निवडून आले.
उत्पल पर्रिकर यांच्याबद्दल...
उत्पल यांनी अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव उमा सरदेसाई आहे. उमा यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. मनोहर पर्रिकर यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव अभिजित आहे. उत्पल यांना एक मुलगा असून त्याचं नाव ध्रुव आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांनी देखील उत्पल यांच्या पाठिंबा दिला आहे. शैलेंद्र यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून अर्ज मागे घेतला होता. शैलेंद्र हे गोव्यातील आरएसएसचे माजी अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र आहेत.
अतानासयो मोन्सेरात यांच्याबद्दल
अतानासयो मोन्सेरात हे पाच वेळा आमदार आहेत. त्यांनी युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी (UGDP) कडून दोन वेळा आणि काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. अतानासिओ यांचा मुलगा रोहित हे पणजीचे महापौर आहेत. त्यांची पत्नी जेनिफर या देखील आमदार आणि राज्य सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. मोन्सेरात 2002 पासून राजकारणात आहेत. मोन्सेरात हे रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायातही गुंतलेले आहेत. शिवाय त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत.
मतदारांची संख्या
भाजपचे श्रीपाद येसो नाईक हे पणजी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2017 मध्ये पणजी विधानसभा मतदारसंघात 22,203 मतदार होते तर 17,339 वैध मते पडली होती. सध्या 22489 मतदार असून त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 10619 इतकी आहे. तर महिलांची संख्या 11870 आहे.