माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी व महायुती म्हणून होत आहेत. त्यामुळे, यंदा जागावाटपात मोठा क्लिष्ट पाहायला मिळाला. तर, एकच जागा असल्याने विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुकांची नाराजी झाली. त्यामुळे, राज्यातील बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. पण, बंडखोरीनंतरही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आहे.अनेक बंडखोरांची तलवार मान्य करण्यात पक्षाला यश आलं. मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली तर काहींनी पक्षांतर केले. त्यामध्ये, केज (kej) विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangita Thombare) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. आता, संगीत ठोंबरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचं टेन्शन वाढलं आहे.
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. स्वत: बजरंग सोनवणे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल, असा विश्वास यावेळी बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, केज मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे यांनी आज माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल, याची खात्री आहे. pic.twitter.com/o5crdQYxiC
— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) November 7, 2024
संगीता ठोंबरे 2014 मध्ये आमदार
दरम्यान, 2014 मध्ये संगीता ठोंबरे केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी उमेदवारी मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे.
ज्योती मेटे यांची बीड विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीमध्ये बीड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी बंडखोरी करत ज्योती मेटे यांनीही आपली उमेदवारी अर्ज भरला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे ज्योती मेटे या अपक्ष उमेदवार म्हणून बीड विधानसभा निवडणुकीमध्ये असतील.
हेही वाचा
सोपलांच्या घरासमोर राजेंद्र राऊत समर्थकांचा गोंधळ; आमदार म्हणाले, आधी त्यांच्याकडूनच अश्लील हावभाव