Aditya Thackeray: अजय चौधरींना खुल्या ऑफर आल्या असतील; मनसे भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा शिवडीत हल्लाबोल
Shivadi Assembly Constituency: आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारसह भाजप, शिंदे गट आणि मनसेवर निशाणा साधला.
Shivadi Assembly Constituency मुंबई: आगामी विधानसभेची निवडणूक सर्वांत महत्वाची ठरणार आहे. ही निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी, माझ्यासाठी नाहीतर महाराष्ट्रासाठी महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत नाव महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र होणार, हे ठरणार आहे. भाजपने सर्व उद्योगधंदे पळवले, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. शिवडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारसह भाजप, शिंदे गट आणि मनसेवर निशाणा साधला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा इम्पॅक्ट पूर्ण मुंबईवर होणार आहे. भाजप मुंबई एकटी जिंकू शकत नाही, हे माहीत होत म्हणून त्यांनी दंगली घडवायचे होते. पालिकेचे निवडणूक न घेता त्यातील कमिटीमधून अनेक भूखंड अदानीच्या खिश्यात घातल्या. मुंबईसाठी लढलो आणि त्या मुंबईची जमीन फुकट अदानीला देणं मान्य आहे का?, नसेल तर भाजपला मतदान करायचं नाही. मनसे भाजपची बी टीम आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि मनसेला मतदान करुन चालणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
अजय चौधरींना खुल्या ऑफर आल्या असतील- आदित्य ठाकरे
अजय चौधरी मंचावर आहेत त्यांना देखील तेव्हा खूप ऑफर आल्या असतील, दबाव आला असेल. इथे सुधीर साळवी देखील आहे. उद्धव ठाकरे आपला माणूस म्हणून उदाहरण देतात, तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात सुधीर साळवींचं उदाहरण देतात, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच अजय चौधरी यांनी देखील सुधीर साळवींचं कौतुक केलं. शिवडी निष्ठावंतांची हे सुधीर साळवी यांनी साध्य करुन दाखवलं. महाराष्ट्रात मुंबई आणण्यासाठी आम्ही रक्त सांडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कपटनीती केली. मराठी माणूस इकडे टिकवायचा नव्हता. नालायक लोकांनी मुंबईचा पैसा लुटला, असा हल्लाबोल अजय चौधरी यांनी केला.
अजय चौधरींच्या खांद्याला खांदा लावून सुधीर साळवींचा प्रचार-
मुंबईतल्या शिवडीत विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय विधानसभा संघटक सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंचा मान राखून खिलाडूवृत्तीनं स्वीकारला होता. पण शिवडीतल्या त्या नाराजीनाट्यावर आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पडदा पडला. निमित्त होतं अजय चौधरी यांच्या शिवडीतल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. या कार्यक्रमात आधी आदित्य ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना कडकडून आलिंगन दिलं. त्यानंतर सुधीर साळवी, अजय चौधरी, आदित्य ठाकरे आणि दगडूदादा सकपाळ यांनी एकमेकांच्या कमरेत हात घालून विजयाची खूण केली. शिवडी मतदारसंघात आपण अजय चौधरींच्या खांद्याला खांदा लावून ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचं सुधीर साळवींनी सांगितलं.