PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
मनपा निवडणुकीत शाईऐवजी मार्करने मतदान केल्याची खूण झटक्यात निघून जात असल्याने दुबार मतदानाला वाट मोकळी करून दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Election Commission: निवडणुकीसाठी आयोगाने जी शाई वापरली आहे ती भारत निवडणूक आयोग जी 'इंटेलिबल इंक' (Indelible Ink) वापरते, तीच आहे. यामध्ये दुसरा कुठलाही घटक नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलं आहे. मनपा निवडणुकीत शाईऐवजी मार्करने मतदान केल्याची खूण झटक्यात निघून जात असल्याने दुबार मतदानाला वाट मोकळी करून दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. वाघमारे म्हणाले, राज्य निवडणूक आयोग 2011 पासून मार्कर पेनच्या स्वरूपात ही शाई वापरत आहे. शाई लावल्यानंतर ती सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात. एकदा ही शाई ड्राय (कोरडी) झाली की ती कुठल्याही प्रकारे काढता येत नाही. आम्ही 2011 पासून 'कोरस' (Kores) कंपनीचेच मार्कर पेन वापरत आहोत, दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे नाही. काही राजकीय नेते संभ्रम पसरवत आहेत की ही शाई पुसली जाते, पण शाई ड्राय झाल्यानंतर ती पुसली जात नाही. नेलपेंट रिमूव्हर किंवा हँडवॉशने ही शाई निघते, हे म्हणणे चुकीचे आहे.
PADU यंत्राबाबत आक्षेपावर म्हणाले..
त्यांनी सांगितले की, पाडू यंत्राबाबतचा आक्षेप पूर्णपणे चुकीचा आहे. हे यंत्र 2004 पासून वापरात आहे, ते काही नवीन नाही. हे एक डिस्प्ले युनिट आहे. जर तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमधील डेटा दिसत नसेल, तर पाडू लावून तो मिरर डिस्प्लेद्वारे वाचता येतो. ज्या ईव्हीएम मॉडेल्सना (M3) व्हीव्हीपॅट (VVPAT) लागत नाही, तिथे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत पाडूचा वापर केला जातो. सुमारे 2 टक्के ईव्हीएम खराब झाल्याचे मी मान्य करतो. या ईव्हीएम फार जुन्या आहेत, गेल्या 10 वर्षांत नवीन ईव्हीएम घेतलेल्या नाहीत. खराब यंत्रे आम्ही बदलली आहेत.
निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत आहे
ते म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्षप काम करत आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. आम्ही कोणावरही फेव्हरिटिझम करत नाही. मुद्दाम फेक नॅरेटिव्ह आणि संभ्रम निर्माण केला जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोगावर ढकलल्या जात आहेत. जर कोणी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल, तर त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मतदार यादी आणि मतदारांची जबाबदारी
मतदार यादीत आपले नाव शोधणे ही मतदारांची देखील जबाबदारी आहे. 85 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांना वोटर स्लिप देण्यात आली आहे. मतदारांनी वेळेवर आपले नाव 'मताधिकार' ॲप किंवा पोर्टलवर शोधायला हवे होते. मतदान केंद्रावर बीएलओ (BLO) बसलेले आहेत, तिथे जाऊनही क्रमांक शोधता येतो, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या




















