Bharat Gogawale: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार! पण शिवसेनेला कोण-कोणती खाती मिळणार? भरत गोगावले म्हणाले, 'सगळीच वजनदार खाती...'
Bharat Gogawale on Oath Ceremony: एकीकडे शपथविधीची धामधूम आहे, तर दुसरीकडे शिवसेनेला कोण-कोणते खाते मिळणार याबाबत शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगोवले यांनी माहिती दिली आहे.
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीचा सोहळा आज काही वेळात पार पडणार आहे. यासाठी राज्यासह देशभरातील नेत्यांना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, दरम्यान या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह इतर खात्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार का याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, आज फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. एकीकडे शपथविधीची धामधूम आहे, तर दुसरीकडे शिवसेनेला कोण-कोणते खाते मिळणार याबाबत शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगोवले (Bharat Gogawale) यांनी माहिती दिली आहे.
आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. कदाचित 11 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा आम्हाला वाटतं. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो वेळ दिलेला आहे, तो कमी आहे असं म्हटलं जातंय. त्या वेळेमध्ये इतक्या सर्व जणांचे शपथविधी होणे शक्य नाही. त्यामुळे कदाचित आज फक्त तिघांचा शपथविधी होईल. बाकी अकरा तारखेला होईल अशी माहिती भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिली आहे.
शिवसेनेला किती मंत्रीपद मिळतील
शिवसेनेला मंत्रिमंडळात किती मंत्री पद मिळतील या प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, याची चर्चा एकनाथ शिंदे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सर्वजण करत आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की, आपल्या पक्षाला जास्त मंत्रिपद मिळावेत आणि त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांची चर्चा चालू आहे. ती योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं, असं भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणालेत.
शिवसेनेला कोणती खाती मिळतील?
शिवसेनेला वजनदार खाती हवी आहेत, त्यापैकी कोणती खाती मिळतील या प्रश्नावर बोलताना भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, तसं बघायला गेलं तर सगळीच वजनदार खाती आहेत, कोणती खाती हवी तो मागण्याचा अधिकार सर्वस्वी एकनाथ शिंदे यांना दिला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे जे काय करतील ते पक्षाच्या हितासाठी करतील असा आम्हाला वाटतं. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मागण्या करत असतो. चर्चा करून तो प्रश्न सोडवला जाईल योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील. एकनाथ शिंदे यांनी मागितलेली जी खाते आहे त्यावरती विचार विनिमय चालू आहे, कदाचित आज ते स्पष्ट होईल असेही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पुढे म्हटलं आहे.