मधुरिमाराजेंची माघार, कोल्हापूर उत्तरसाठी आता काँग्रेसचा प्लॅन बी, 'या' अपक्ष उमेदवाराला ताकद पुरवणार!
कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात 4 नोव्हेंबर रोजी मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 4 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. येथील कोल्हापूर उत्तर या जागेवरील काँग्रेसच्या आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मधुरिमाराजे यांच्या या निर्णयानंतर आता या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीला उमेदवारच नाही, अशी स्थिती उभी राहिली आहे. असे असतानाच आता काँग्रेसने घेतलेल्या नव्या निर्णयाची माहिती समोर आली आहे.
सतेज पाटील यांची तीव्र नाराजी
मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माघार घ्यायची होती तर उभे राहायचेच नव्हते. उभे राहणार नाही, हे अगोदरच सांगायला हवे होते, असे म्हणत सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता कोल्हापुरात येथे उमेदवारच नसल्यामुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. काँग्रेसचे हात हे निवडणूक चिन्हच यावेळी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात नसेल. त्यामुळे येथे काँग्रेसवर एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.
राजेश लाटकर यांना पाठिंबा
काँग्रेसने राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. लाटकर हे काँग्रेसचेच नेते आहेत. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच लाटकर यांच्यामागे आता काँग्रेस आपली ताकद उभी करणार आहे.
लाटकर यांचे तिकीट कापून मधुरिमाराजे यांना संधी
काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना तिकीट दिले होते. थेट दिल्लीहून आलेल्या यादीत लाटकर यांचे नाव होते. मात्र काही नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. तसे पत्र या नगरसेवकांनी सतेज पाटील यांना दिले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये असलेले आपले वजन वापरून सतेज पाटील यांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून मधुरिमाराजे यांना तिकीट दिले. मात्र मधुरिमाराजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता सतेत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली. आता काँग्रेसला लाटकर यांना पाठिंबा द्यावा लागत आहे. आता या मतदारसंघाबाबत भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :