मोदींनी खामगावमध्ये यावं आणि माझ्या विरोधात सभा घ्यावी, काँग्रेस उमेदवाराचं थेट पंतप्रधानांना आव्हान
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव मधील काँग्रेसचे उमेदवार दिलीप सानंदा (Dilip Sananda) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनाचं आव्हान दिलं आहे.
Buldhana Maharashtra Vidhansabha Election : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव मधील काँग्रेसचे उमेदवार दिलीप सानंदा (Dilip Sananda) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनाचं आव्हान दिलं आहे. 2014 मध्ये खामगाव येथे येऊन मोदींनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचे दिलीप सानंदा म्हणाले. त्यामुळं मोदींनी पुन्हा खामगावमध्ये यावं आणि माझ्या विरोधात सभा घ्यावी असं सानंदा म्हणाले.
2014 साली विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी माझ्याविरुद्ध खामगाव येथे सभा घेतली होती. त्या सभेत मोदींनी अनेक आश्वासने दिली होती. मात्र एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा माझ्या विरोधात खामगावमध्ये सभा घ्यावी असं आव्हानच खामगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रानात दिलीप सानंदा यांनी केला आहे. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एबीपी माझा शी बोलताना म्हणाले की, माझा विजय या निवडणुकीत नक्की आहे. कारण नरेंद्र मोदींनी एकही आश्वासन या मतदारसंघाच्या नागरिकांसाठी पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं या मतदारसंघात त्यांना आता मतदान लोक करणार नाहीत. सोबतच त्यांच्या पत्नी अलकादेवी सानंदा यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
फुंडकर विरुद्ध दिलीप सानंदा यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता
खामगाव विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे आकाश पांडुरंग फुंडकर 90,757 मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आकाश पांडुरंग फुंडकर हे 71,819 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाचे दिलीप सानंदा यांचा पराभव केला होता. खामगाव विधानसभा मतदारसंघात सध्या आकाश फुंडकर हे आमदार आहेत. दरम्यान, यावेळी फुंडकर विरुद्ध दिलीप सानंदा यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच पक्षांनी खपाटून प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, अशातच प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या विविध मुद्यावरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. तर सत्ताधारी पुन्हा आम्हीच सत्तेवर येऊ असा दावा करताना दिसत आहेत.