(Source: Poll of Polls)
“वंदे मातरम्” 150 वर्षांचा श्वास, रक्तात मिसळलेलं राष्ट्रीय गीत

एक शतक अर्धं संपलं... आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे “वंदे मातरम्!” जेव्हा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली हे शब्द कागदावर उतरवले, तेव्हा ती फक्त कविता नव्हती... तर ते होतं एका झोपलेल्या देशाच्या जागरणाचा शंखनाद. त्यात होती एक वेदना, एक ज्वाला आणि एक नतमस्तक प्रणाम भारतमातेपुढे.
“सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्...”
त्या काळात भारत देश पारतंत्र्यात होता. पराधीनतेच्या अंधारात भारतीयांचा आत्मविश्वास हरवला होता. पण “वंदे मातरम्”च्या प्रत्येक ओळीने लोकांच्या मनात पुन्हा रक्त उसळायला लागलं. वंदे मातरम् च्या प्रत्येक शब्दातून जणू आईच्या पदराचा स्पर्श जाणवत होता.
त्या गीताने भारतीयांना आठवण करून, “आपली मातृभूमी जिवंत आहे… आणि तिचं रक्षण करायचं दायित्व आपल्या रक्तात आहे!”
त्या काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसेवकाच्या तोंडात “वंदे मातरम्” हा मंत्र होता. ब्रिटिशांची सत्ता हादरली कारण या दोन शब्दांत संपूर्ण भारत एकवटला होता. ज्यांच्या हातात तलवार नव्हती, त्यांनी “वंदे मातरम्”च्या हाकेने लढा दिला. त्या हाकेत गोळी नव्हती, पण तर हृदयात झिरपणारा बाण होता.
जेव्हा शहीद भगतसिंग, खुदीराम बोस, बाळ गंगाधर टिळक, आणि राणी लक्ष्मीबाई यांसारखे वीर मातृभूमीसाठी लढले, तेव्हा या गीताचा प्रत्येक स्वर त्यांच्यासोबत रणांगणात घुमत होता. “वंदे मातरम्” हे केवळ राष्ट्रीय गीत नव्हे, तर स्वातंत्र्याची एक प्रकारे शपथच होती.
150 वर्षांचा प्रवास, एक जिवंत श्वास
1875 ते 2025 - अशा 150 वर्षांत किती पिढ्या गेल्या, किती झेंडे फडकले, किती नद्या कोरड्या झाल्या...पण या गीताचा एकही स्वर जुना झाला नाही. आजही शाळांमध्ये मुलं हे गीत गातात, सैनिक सीमारेषेवर पुटपुटतात आणि कुणी राष्ट्रीय गीताच्या आवाजात उभं राहतो तेव्हा अंगावर काटा येतो. मातृभूमीच्या रक्तात, तिच्या पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये आणि आपल्या प्रत्येक श्वासात, क्रांतीचा जयघोष बनलेलं असं हे गीत 150 वर्ष पूर्ण करत आहे.
पण या 150 वर्षांच्या टप्प्यावर प्रश्न फक्त एकच आहे, आपण काय करतो त्या मातृभूमीसाठी?
आपण त्या मातेला परत काय दिलं? आपण तिची माती जपली का? तिचं पाणी, तिचं आकाश, तिच्या भाषेची शुद्धता जपली का? की आपण तिच्या कुशीत राहूनही परकीय मोहात हरवलो?
“वंदे मातरम्” म्हणणं सोपं आहे, पण त्याचा अर्थ जगणं म्हणजे प्रामाणिक राहणं, देशासाठी काहीतरी करणं,आणि प्रत्येक क्षणी मातृभूमीचा सन्मान राखणं.
कधी आईचा हात डोक्यावर ठेवतो ना, तेव्हा मिळणारा आशीर्वाद म्हणजे “वंदे मातरम्”.
कधी सैनिकाची रक्ताळलेली माती पाहतो, तेव्हा त्या मातेनं घेतलेला श्वास म्हणजे “वंदे मातरम्”.आणि कधी राष्ट्रध्वज वाऱ्यात फडफडताना दिसतो, तेव्हा त्या तिरंग्याच्या रंगांत मिसळलेले शब्द म्हणजे “वंदे मातरम्!”
150 वर्षांपूर्वी लिहिलेलं गाणं आजही आपला आत्मा हलवून जातं. कारण त्यात भक्ती, वेदना आणि प्रेम आहे आणि म्हणूनच ते केवळ राष्ट्रगीत नाही, तर भारताचं धडधडतं हृदय आहे, वंदे मातरम् !




















