Beed Lok Sabha: माझाही पराभव झाला होता, तुम्ही आदळआपट करुन काय साध्य करणार? पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल
Beed News: आदळआपट करून काय साध्य करणार आहात, बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांचा सवाल. माझाही पाच वर्षांपूर्वी पराभव झाला होता मात्र तो हसतमुखाने मी स्वीकारला होता. त्यामुळे मला फळाची चिंता नाही.
बीड: बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून अगदी मतमोजणी प्रक्रियेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या. अगदी बीडच्या जिल्हाधिकारी या मतमोजणी प्रक्रियेत नको, असा आरोप केला होता. यावर बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केवळ विशिष्ट एका जातीचे आहेत म्हणून कोणावरती असे आरोप करणं हे योग्य नाही. इतकी आदळआपट करणं बरोबर नाही. तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणेंना दिला.
मी कर्म चांगली केली आहेत. त्यामुळे मला फळाची चिंता नाही,मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाहीत. 4 जूनच्या निकालानंतर नेमकं काय बदलणार आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडचा खासदार बदलणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
बजरंग सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले
बीड लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बजरंग सोनावणे यांनी रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. "कांबळे साहेब हात आकडू नका, अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ का?", असं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. बजरंग सोनवणे हे मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करायला आले असताना हा प्रकार घडला होता.
बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला होता. मात्र, स्ट्राँग रूमची पाहणी केल्यानंतर केल्यानंतर बजरंग सोनावणे यांच्या शंकेचे निरसन झाले होते. यानंतर माध्यमांना सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला होता. तुम्ही प्रशासन म्हणून नियमाप्रमाणे मदत केली पाहिजे. तुम्ही ऐकणार नसाल तर आमचा राजकीय अंत करणार आहात,असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं चालणार नाही, अशी विनंती निवडणूक अधिकाऱ्यांना केल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले होते.
बीड लोकसभेचा एक्झिट पोल काय सांगतो?
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या फॅक्टरमुळे धक्कादायक निकालाची नोंद होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांचा पराभव होऊ शकतो. परंतु, बजरंग सोनावणे यांनी प्रत्यक्ष निकाल हा एक्झिट पोलपेक्षा वेगळा असेल, असा दावा केला आहे. पंकजा मुंडे या बीडमध्ये माझ्यासमोर आहेच कोण, असे म्हणत होत्या. परंतु, आता त्यांना माझी ताकद समजेल, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
बजरंग सोनवणे यांचा वक्तव्यावरून यू टर्न; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काय म्हटलं ते सांगितलं