Amit Thackeray vs sada sarvankar: शिवतीर्थच्या पायरीपर्यंत जाऊन सदा सरवणकरांना रिकाम्या हाती माघारी का परतावं लागलं? वाचा माहीम विधानसभेची इनसाईड स्टोरी
Mahim vidhan sabha constituency: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे Vs महेश सावंत Vs सदा सरवणकर अशी तिहेरी लढत होणार आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सोमवारी माहीम विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभेतून (Mahim Vidhan Sabha) माघार घेऊन अमित ठाकरे यांची वाट मोकळी करावी, यासाठी महायुतीच्या गोटातून प्रयत्न सुरु होते. मात्र, अखेर हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभेतील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.
माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांच्या माघारीसाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील, अशी चर्चा शेवटपर्यंत होती. त्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांना अपेक्षित प्रतिसादही मिळाला होता. मात्र, ऐनवेळी चर्चेचे गाडे पुढे सरकले नाही आणि तहाचे एकूण प्रयत्न निष्फळ ठरले. ही बोलणी फिस्कटण्यासाठी राज ठाकरे यांनी 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात केलेली दोन विधानं कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी, 'राज्यात महायुतीच सत्ता येईल आणि मुख्यमंत्री भाजपचा असेल', असे म्हटले होते. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड खटकल्याचे सांगितले जाते. यामुळे एकनाथ शिंदे यांनी माहीममधून माघार घेण्यासाठी सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि हा निर्णय सर्वस्वी सरवणकर यांच्यावर सोडून दिल्याचे सांगितले जाते.
माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे: राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरे यांनी मुत्सद्दीपण दाखवणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचणारे विधान केले. त्यांनी 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या फुटीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावरुन एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने मनसेच्या उमेदवारांना धनुष्यबाणाच्या निशाणीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, अहो आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. राज ठाकरे यांची ही टीका एकनाथ शिंदे यांच्या वर्मी लागल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा
राज ठाकरे म्हणाले, भाजपचा मुख्यमंत्री होईल; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया