Eknath Shinde On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, भाजपचा मुख्यमंत्री होईल; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On MNS Raj Thackeray: पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार येणार, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
Eknath Shinde On MNS Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार (Maharashtra Mahayuti Goverment) येणार, असं विधान केलं. राज ठाकरेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला काल राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार...या राज ठाकरेंच्या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या विधानावर भाष्य केलं आहे. मी पहिल्यापासून सांगतोय आम्ही महायुती टीमवर्क करतेय. महायुतीने 3 वर्षांत केलेलं काम आणि महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत केलेलं काम, तुलना होऊन जाऊदेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या सरकारने तर रिपोर्ट सादर केला आहे. रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागते, धाडस लागतं आणि महत्वाचं म्हणजे काम करावं लागतं,असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. मला विश्वास आहे, इलाका कोणाचाही असूदेत, धमाका फक्त आम्हीच करणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती सरकारने केलेल्या कामाची पोहचपावती आमच्या लाडक्या बहीणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके कामगार देणार, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमातून यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत केल्याने निवडणूक निकालापर्वीच राज ठाकरेंनी विधानभेचा निकालाच जाहीर केला असून हा आपला अंदाज असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे, राज ठाकरेंनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केलं आहे. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यापासून पाठिंबाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन...मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन, असं अमित म्हणाला. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या निवडणुकीत उभा करावाचं लागेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच अमितप्रमाणे अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह इतर उमेदवार देखील माझ्यासाठी समान आहे, त्यांच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार, असं राज ठाकरे म्हणाले.