Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
maharashtra vidhan sabha election 2024: माझा भाऊ माझ्यावर खूप नाराज, तो आता फार टोकाचं बोलतोय; अजित पवार श्रीनिवास पवारांवर पहिल्यांदाच बोलले
मुंबई: राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) हे पु्न्हा एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास स्वल्पविराम मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी दैनिक 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले.
यावेळी अजित पवार यांनी अलीकडच्या काळात त्यांच्यावर कडाडून टीका करणारे त्यांचे बंधू आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्याबाबतही भाष्य केले. माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे. तो फारच टोकाचे बोलायला लागला आहे. कशामुळे त्याला असे वाटायला लागले, त्याचा स्वभाव असा का झाला, कळायला मार्ग नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी या मुलाखतीत युगेंद्र पवार आणि बारामतीच्या लढाईबाबतही भाष्य केले. यावेळी घरातला सख्खा पुतण्या उभा आहे. मी राजकीय भवितव्य पणाला लावले असे मला वाटत नाही. ही लढाई आमच्या मतदारांनी हातात घेतली आहे. जसे लोकसभेला त्यांनी ठरवले होते, सुप्रिया सुळे आणि विधानसभेला दादा त्या पद्धतीने ते करतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जास्त कधी संबंध आला नाही. मी माझ्या कामात व्यस्त असतो, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. सुप्रिया सुळे यांच्याशी मी एक-दोन वेळा फोनवर बोललो आहे. भाऊबीजेला मी सकाळी पावणेसातला बाहेर पडलो. मी तेव्हा सांगितल होते की, साडेसहाला जेवढ्या बहिणी येतील, त्यांची भाऊबीज करुन मी बाहेर पडणार. तीन बहिणी आल्या, त्यांची भाऊबीज करुन मी बाहेर पडलो, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा